'पवार चुलता-पुतण्याने 20 वर्षे घरात कोंडून ठेवले आणि हा म्हणतोय...'; आमदार शहाजीबापूंची फटकेबाजी
पवार काका-पुतण्या (शरद पवार आणि अजित पवार) यांनी मला 20 वर्षे कोंडून ठेवले आणि आता हा म्हणतोय पवारांवर बोलायचे नाही अशी फटकेबाजी आज आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil ) यांनी केली.

Shahaji Patil On Sharad Pawar And Ajit Pawar : पवारांचे जोडे उचलूनही पवार काका-पुतण्या (शरद पवार आणि अजित पवार) यांनी मला 20 वर्षे कोंडून ठेवले आणि आता हा म्हणतोय पवारांवर बोलायचे नाही अशी फटकेबाजी आज आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil ) यांनी केली. अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्या सांगोला येथील धाराशिव साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात शहाजीबापू पाटील बोलत होते.
याच कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्रवादीचे राज्य सचिव आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी बापूंना भाषण करताना डिवचले. सध्या राज्यात फक्त एकाच नेत्याच्या भाषणांची जोरदार चर्चा असल्याचा टोला शहाजीबापूंना लागवताना आता आजपासून पवार साहेबांवर बोलायचे नाही असा संकल्प करा, असा चिमटा घेतला. यावर शहाजी बापू काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
बापूंनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपण पवार यांच्यासाठी काय काय केले हे सांगताना आम्ही त्यांची चप्पल सुद्धा उचलून त्यांच्या पायापाशी ठेवली होती. मात्र पवार काका पुतण्याने 20 वर्षे मला घरात कोंडून ठेवल्याचे टोले लगावले.
सांगोल्यात प्रत्येक वेळी पवार यांनी शहाजीबापूंच्या विरोधात शेकापला पाठिंबा देत राहिल्याने शहाजीबापू यांची राजकीय कोंडी होत होती. पवारांच्या मदतीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख विजयी व्हायचे आणि शहाजीबापू पराभूत व्हायचे. आपल्या राजकीय वनवासाला शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच जबाबदार असल्याचा राग शहाजीबापू पाटील यांच्या डोक्यात कायम आहे.
त्यामुळेच पवारांवर टीका करणे बंद करा म्हणल्यावर पवार काका पुतण्याने 20 वर्षे मला घरात डांबून ठेवले आणि आता मला त्यांच्यावर बोलू नका असे असे हा म्हणतोय असे म्हणत जोरदार टोलेबाजी केली. शहाजीबापूंच्या या टोलेबाजीला प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत जोरदार प्रतिसाद दिला.
काही दिवसांपासून शहाजी बापू पाटील हे शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातच शहाजी बापूंनी शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा 50 आमदारांच्या वर जात नाही. एवढ्यातच त्यांचा खेळ सुरू आहे, असं म्हटलं होतं. शरद पवार यांनी वेगळी काँग्रेस काढली, त्यानंतर राष्ट्रवादीतून इतक्या निवडणूक लढवल्या, पण त्यांना पन्नाशी ओलांडता आलेली नाही. ज्यावेळी 55 ते 60 आमदार आले ते आर आर आबा यांचे क्रेडिट होते, असं शहाजीबापूंनी म्हटलं होतं. आता कितीही दौरे करा, महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभी असल्याने किमान पुढची पंधरा वर्षे तरी सुप्रियाताईंनी हे विसरून जावे असंही ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
शरद पवारांनी कितीही दौरे केले तरी फरक पडणार नाही, शहाजीबापू पाटील यांचं टीकास्त्र
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
