शरद पवारांनी कितीही दौरे केले तरी फरक पडणार नाही, शहाजीबापू पाटील यांचं टीकास्त्र
Shahaji Bapu Patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा 50 आमदारांच्या वर जात नाही. एवढ्यातच त्यांचा खेळ सुरू आहे.
Shahaji Bapu Patil on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा 50 आमदारांच्या वर जात नाही. एवढ्यातच त्यांचा खेळ सुरू आहे. एकदा 50 आकडा ओलांडला तोही स्वर्गीय आर आर पाटील यांच्या प्रयत्नामुळे, असा टोला आज सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे. शरद पवार यांनी वेगळी काँग्रेस काढली, त्यानंतर राष्ट्रवादीतून इतक्या निवडणूक लढवल्या, पण त्यांना पन्नाशी ओलांडता आलेली नाही. ज्यावेळी 55 ते 60 आमदार आले ते आर आर आबा यांचे क्रेडिट होते, असे सणसणीत उत्तर शहाजीबापू यांनी दिले आहे. आता कितीही दौरे करा, महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभी असल्याने किमान पुढची पंधरा वर्षे तरी सुप्रियाताईंनी हे विसरून जावे अशा भाषेत त्यांनी हल्ला चढवला.
शिवतीर्थावर दशहरा मेळाव्याला जाणारे सर्व पवारांच्या विचाराचे असतील तर तर बीकेसीवर जाणारे बाळासाहेब ठाकरे यांचे कडव्या विचाराचे शिवसैनिक असतील, असा टोला शिंदे यांच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले.
बीकेसी मैदानावर होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळाव्याला सांगोला तालुक्यातून दहा ते पंधरा हजार शिवसैनिक जाणार आहेत. बीकेसी येथे होणारा हा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. जे शिवतीर्थावर जातील ते जाणते राजे शरद पवार यांच्या विचाराचे असतील. तर बीकेसी मैदानावर जमणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक असे म्हणत शिवसेनेला डिवचले आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी चिमटे काढले आहेत. अजित दादा पवार आधी उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणार आहेत या दादांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पाटील यांनी टीकास्त्र सोडलं. आता दादाकडे फक्त भाषण ऐकण्याशिवय काय काम उरले नाही. कायम सत्तेत राहण्याची सवय लागलेल्या अजितदादांना पक्षाचे काम कसे करायचे हेच माहित नाही, असा टोला लगावला. आता दादांनी सगळी भाषणे ऐकून झाल्यावर इंदोरीकर महाराज यांची कीर्तने ऐकावीत , ओशो ची कॅसेट सीडी त्यांनीं घ्याव्यात असा टोलाही शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.
आणखी वाचा :
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची जागा शिंदे गटाच्या दसरा मेळावा पार्किंगसाठी, विद्यार्थी संघटनांचा जोरदार विरोध
उद्धव ठाकरे यांना 1996 सालीच मुख्यमंत्री व्हायचं होतं, बाळासाहेबांचीही भेट घेतली; सुरेश नवले यांचा गौप्यस्फोट