(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PCMC Drug News : IT सिटी की ड्रग्ज सिटी? पुण्यात MD ड्रग्ज आणि पॉपी पावडरसारखे अतिशय घातक अमली पदार्थ विकणाऱ्यांना बेड्या
पुण्यासोबतच पिंपरी-चिंचवड शहरदेखील ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचं समोर आलं आहे. एमडी ड्रग्ज आणि पॉपी पावडरसारखे अतिशय घातक अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : शिक्षणाचं माहेरघर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचं (Pune Crime News) दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज पुरवण्याऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांनी धडाधड कारवायादेखील सुरु केल्या आहेत. त्यातच पिंपरी- चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी सिटी परिसरात एमडी ड्रग्ज आणि पॉपी पावडरसारखे अतिशय घातक अमली पदार्थ विकणाऱ्या दोन राजस्थानी पेडलरला अमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही ड्रग्स पेडलर कडून पिंपरी- चिंचवड शहर पोलिसाच्या अमली पदार्थ विरोधी पोलिस पथकाने जवळपास 1 किलो 750 ग्रॅम अफूचा चुरा आणि 61 ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त केल आहे.
हिंजवडी आयटी सिटी परिसरामध्ये दोन ड्रग्स पेडलर हे आयटी अभियंता तरुण-तरुणींना अमली पदार्थ विक्री करण्यासाठीं येणार आहेत, अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी रवीप्रकाश सुखराम बिश्नोई आणि सुरेशकुमार साईराम बिश्नोई या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
शहर ड्रग्जच्या विळख्यात...
काही दिवसापूर्वीच पुणे परिसरातून तब्बल 50 कोटी रुपयांचा 101 किलो मेथाक्युलोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या 5 जणांना अटक करण्यात आली होती. ही कारवाई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना एका कारमध्ये पाच जण मेथाक्युलोनसह पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून एक वाहन जप्त केलं होतं. वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले 4 निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम आढळून आले होते. यामध्ये मेथाक्युलोन हा पदार्थ आढळला असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी लागलीच पाच जणांना अटक केली होती. आरोपी बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचंदेखील समोर आलं होतं.
पुण्यात नक्की चाललंय काय?
2019 ते 2021 या तीन वर्षांत पुणे पोलिसांनी 8 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. मागील दहा वर्षांच्या तुलनेत पाच महिन्यांत सर्वाधिक म्हणजे 7 कोटी 24 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. साडेपाच वर्षांत 22 कोटी 17 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगर सारखे अमली पदार्थ जप्त केले आहे.