मोठी बातमी! विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली, या खोलीत नेमकं काय? पुरातत्व विभाग करणार पाहणी
पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या (Pandharpur Vitthal Mandir) संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली सापडली (Secret room foun) आहे.
Pandharpur Vitthal Mandir : पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या (Pandharpur Vitthal Mandir) संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली सापडली (Secret room foun) आहे. त्यामध्ये पुरातन मुर्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काल रात्री 2 वाजता ही गुप्त खोली आढळून आली आहे. दरम्यान, आज मंदिर समितीसह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभागाची टीम पाहणी करणार आहे.
आज रात्री पुरातत्व विभागाची टीम गुप्त खोलीची पाहणी करणार
सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली आढळून आली आहे. ही खोली सहा फूट खोल आणि सहा फूट रुंद अशा आकाराची आहे. यामध्ये आत मूर्तीसदृश्य वस्तू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आज रात्री पुरातत्व विभागाची टीम आत उतरणार आहे. या खोलीत नेमकं काय आहे ह पाहणार असल्याची माहिती मिळत आहे.
2 जूनपासून विठ्ठल मंदिर पूर्ववत पदस्पर्शाने सुरु करण्यात येणार
गेल्या 15 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे (Vitthal Rukmini Mandir) चरण स्पर्श दर्शन बंद होते. तेव्हापासून मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम पुढेही 17-18 महिने सुरु राहणार आहे. पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं येत्या 2 जूनपासून विठ्ठल मंदिर पूर्ववत पदस्पर्शाने सुरु करण्यात येणार असल्याची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे. 2 जूनपासून 9 जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटी पुजा आहेत, त्या सर्व देवाच्या पुजा होणार आहेत. देवाची तुळशी आणि पाद्य पुजा पर्ववत सुरु होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली.
विठ्ठल मंदिर विकासासाठी सुरु असलेल्या 73 कोटीच्या आराखड्यातील कामे सुरु
विठ्ठल मंदिर विकासासाठी सुरु असलेल्या 73 कोटीच्या आराखड्यातील कामे सध्या सुरु आहेत. विठ्ठल मंदिराला पुरातन 700 वर्षापूर्वीचे रूप येऊ लागले आहे. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे. त्यामुळं आता विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर हे 700 वर्षापूर्वी कसे होते? हे सर्वांना पाहता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Vitthal Mandir : तब्बल 79 दिवसांनी होणार विठुरायाचे चरणस्पर्श, भाविकांमध्ये आनंदी-आनंद; पंढरीतील उत्सवाची तारीख ठरली