Dr. Pradeep Kurulkar : ...अन् तिला प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात येणार होती, कुरुलकरांच्या प्रकरणात एटीसचा नवा खुलासा
Dr. Pradeep Kurulkar : डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी भारताची गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तहेरांना पुरवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
Dr. Pradeep Kurulkar : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) (DRDO) हेरगिरी प्रकरणाच्या महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (ATS) केलेल्या तपासात असे उघड झाले आहे की शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर (Pradip Kurulkar) यांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पाचा 'उच्च वर्गीकृत' अहवाल एका महिला पाकिस्तानी गुप्तहेराला स्वत: भेटून दाखवणार होते, असा नवा खुलासा एटीएसने त्यांच्या तपासात केला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कुरुलकर यांनी स्वत:ला त्या महिलेशी संवाद साधताना असा उल्लेख केल्याचं एटीएसने म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एटीएसनं काय म्हटलं त्यांच्या अहवालामध्ये?
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एटीएसने कुरुलकरांना अटक केल्यानंतर या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर आले आहेत. दरम्यान याच प्रकरणातले व्हॉट्सअॅप चॅट्स देखील समोर आले आहेत. तसेच कुरुलकर यांनी राफेल विमानांपासून क्षेपणस्त्रांवरही चर्चा केल्याची माहिती एटीएसला मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे. कुरुलकर यांनी ज्या महिलेशी संवाद साधला त्या महिलेचं नाव जारा दासगुप्ता असं आहे. ती युनायडेट किंगडममधील एका नावजलेल्या कंपनीमध्ये सोफ्टवेअर इंजिनीअर असल्याचं तीने कुरुलकर यांना सांगितलं.
एटीएसने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, कुरुलकर आणि जारा दासगुप्ता नावाची महिला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या महिलेला भारताच्या अनेक महत्त्वाच्या क्षेपणास्त्रांची माहिती पुरवली. यामध्ये ब्रह्मोस मिसाइल, अग्नी-6 मिसाइल, आकाश मिसाइल, अस्त्र क्षेपणास्त्र, ड्रोन प्रोजेक्ट, रुस्तम प्रोजेक्ट, यूसीएव्ही, डीआरडीओ ड्यूटी चार्ट, मिसाइल लाँचर, राफेल यांचा समावेश होता. दरम्यान एटीएसने हे सर्व चॅट्स डॉ. कुरुलकर यांच्याविरोधात दाखल 1837 केलेल्या आरोपपत्रामध्ये समाविष्ट केले आहेत.
डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना एटीएसने 3 मे रोजी गुप्तहेर कायद्याच्या अंतर्गत अटक केली होती. दरम्यान जारा दासगुप्ता या महिलेने कुरुलकरांना अनेक अश्लिल संदेश देखील पाठवले. एटीएसच्या माहितीनुसार त्यांच्यामध्ये 10 जून 2022 ते 24 फेब्रुवारी 2023 दरम्यान बरचं संभाषण झालं. जारा ही कुरुलकरांकडून भारतातील विविध डीआरडीओ आणि संरक्षण प्रकल्पांची गोपनीय माहिती मिळवू इच्छित होती. दरम्यान कुरुलकर हे त्या महिलेकडे आकर्षित होऊ लागले आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचं एटीएसने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
काय आहेत कुरुलकरांचे व्हॉट्सअॅप चॅट्स?
एटीएसने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, या दोघांनी 19 ऑक्टोबर 2022 ते 28 ऑक्टोबर 2022 दरम्यान ब्राह्मोसबद्दल संभाषण केलं आहे. जारा या महिलेने कुरुलकरांना विचारले की, बेब ब्राह्मोस हा देखील तुमचा शोध आहे का? यावर कुरुलकरांनी उत्तर दिलं की, मी ब्रह्मोसच्या सर्व प्राथमिक आवृत्यांचा अहवाल तयार केला आहे. पण मी तो तुला असा व्हॉट्सअप अथवा मेलवर दाखवू शकत नाही. मी तुला भेटून तो दाखवण्याचा प्रयत्न करेन.
ATS ने आरोपपत्रात 28 ऑक्टोबर 2022 च्या या चॅटचा विशेष उल्लेख केला आहे. तसेच एटीएसने दावा केला आहे की, ही माहिती अत्यंत गोपनीय आहे त्यामुळे ती व्हॉट्सअॅप आणि ईमेलवर शेअर केली जाऊ शकत नाही. हे माहीत असूनही, कुरुलकर यांनी जाराला भेटून ती माहिती दाखवण्याचे सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण येणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे.