(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगलीत पार पडला "सत्यशोधक विवाह" सोहळा, लग्नात पुस्तकाच्या रुपात रुखवत
तासगाव तालुक्यातल्या करोली याठिकाणी पुरोगामी विचारांचे व सामाजिक कार्यकर्ते ए.डी.पाटील यांच्या कुटुंबात अनोख्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला आहे.
सांगली : लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत सांगलीमध्ये सत्यशोधक पद्धतीने एक अनोखा लग्न सोहळा पडला आहे. फुलांच्या अक्षता,पुस्तकांचा आहेर-माहेर, पुस्तकांचा रुखवत आणि लग्न मंडपात वीर सैनिकांच्या पत्नींचा सत्कार असा आगळा-वेगळा विवाह तासगाव तालुक्यातील करोली याठिकाणी संपन्न झाला आहे.
'लग्न ' ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर अनेक चुकीच्या प्रथा, कालबाह्य ठरलेल्या रुढी आणि त्यातून होणारे शोषण यांना जणू खतपाणी घालण्याचे कामच या विवाह संस्कृतीने बळकट केल्याचे दिसते. कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा या गोष्टींच्यामुळे अनेक विवाह समारंभांच्या आनंदाला गालबोट लागताना आपण पाहत आलो आहोत. या सर्व अनिष्ट प्रकारांना महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीचा सर्वोत्तम आणि समर्थ पर्याय दिला.मात्र दिखाऊपणाच्या या जगात याला फारस कोणी महत्त्व देत नाही. तासगाव तालुक्यातल्या करोली याठिकाणी पुरोगामी विचारांचे व सामाजिक कार्यकर्ते ए.डी.पाटील यांच्या कुटुंबात अनोख्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला आहे.
उच्च शिक्षीत जोडप्याने निवडला सत्यशोधक विवाहाचा मार्ग
तासगाव तालुक्यातील करोली येथील महादेव धोंडीराम पाटील आणि स्नेहलता या मारुती सावंत देशमुख यांचा विवाह निश्चित झाला,पण हा विवाह सत्यशोधक पद्धतीने करायचा निर्णय दोन्ही नव दांपत्यांनी घेतला होता. शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या उच्च शिक्षित जोडप्याने सर्व रूढी-परंपरांना बाजूला सारत,महात्मा फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीच्या मार्गाने नव्य संसाराची सुरुवात केली आणि करोली याठिकाणी सत्यशोधक पद्धतीने मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला.
असा पार पडला,अनोखा लग्न सोहळा
डॉ.दाभोलकर,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,जिजाऊ डॉ.बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम यांचे फोटो लग्न मंडपाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. याशिवाय संत गाडगेबाबा,महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये प्रतीकात्मक पध्दतीने व्यासपीठावर उपस्थित होते. तर यावेळी लग्न मंडपात नवरा आणि नवरीचे आगमन हे तुतारीच्या निनादात करण्यात आले. विशेष म्हणजे नवरदेव हा नववधूसह हातामध्ये "भारतीय संविधाना"चा ग्रंथ खरेदी करून दाखल झाला. फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन आणि वंदन करून लग्न विधीच्या कार्याला सुरुवात झाली.
मंगलाष्टक आणि तांदळांच्या अक्षतेला फाटा
नवरदेव महादेव पाटील यांचे चुलते सामाजिक कार्यकर्ते ए.डी.पाटील म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 134 वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांची सुरुवात केली. सत्यशोधक पद्धतीने विवाहाची एक चळवळ सुरू केली होती, आणि त्याच विचारातून आपण आपल्या पुतण्याचा विवाह पुरोगामी आणि फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचाराच्या सत्यशोधक पद्धतीने करायचा निर्णय घेतला होता,त्यानुसार रूढी परंपरांना फाटा देऊन हा विवाह सोहळा संपन्न केला आहे. तांदळाच्या अक्षता ऐवजी गुलाबांच्या फुलांचा वापर करून शेतकऱ्यांच्या फुलांचा वापर केला आहे. जेणे करून शेतकऱ्यांना तो फायदेशीर ठरेल आणि धान्याची नासाडी ही होणार नाही,असा संदेश यामधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच वधू-वरांनी वृक्षांना पाणी घालून व निर्मिक पूजन करून शपथविधी घेतला आणि पारंपारिक मंगलाष्टक ऐवजी सत्यशोधिकी मंगलअष्टका यावेळी उच्चरण्यात आल्या,असं पाटील यांनी सांगितले.
नवरीची अशी ही "ज्ञान रुपी" रुखवत
लग्नामध्ये रुखवत या विधीतून मुलीला माहेरच्या मंडळीकडून अनेक गोष्टी देण्यात येतात,त्यामध्ये त्याच्या नव्या संसाराच्या साहित्याचा समावेश असतो. याठिकाणी नववधूचा रुखवत हा सर्वांचा सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. नवरदेव मंडळींकडून मुलीच्या कुटुंबियांना रुखवत मध्ये ज्ञानरूपी पुस्तके देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यावेळी नववधूच्या घरच्यांनी आणि आप्तेष्ट मंडळांनी अनेक थोर पुरुषांची पुस्तके यावेळी नववधूला रुखवत म्हणून दिली. लग्न मंडपात पुस्तकांची ही ज्ञानाची रुखवत मांडण्यात आली होता.
वीर जवानांच्या पत्नींचा सन्मान
या पुरोगामी, सत्यशोधक पद्धतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने पाटीलकडून या लग्नमंडपात देशसेवा बजावणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांचा आणि त्यांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला. देशसेवेच्या बद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि त्यामध्ये प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने यावेळी जिल्ह्यातील सुमारे दहाहुन अधिक वीर जवानांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला.
इतिहास संशोधक कोकाटेनी लग्न सोहळ्याचे केले कौतुक
सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या ए.डी.पाटील यांच्या पुतण्याच्या या"सत्यशोधक विवाह" सोहळ्यासाठी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.यावेळी बोलताना ते म्हणाले, आजच्या समाजाला फुले,शाहू,आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे.आणि या पद्धतीने लग्न पार पडल्यास अनेक अनिष्ट चालीरीतींना मूठ माती मिळेल,याशिवाय खर्चाला ही मोठी फाटा मिळू शकले, त्यामुळे समाजाने सत्यशोधक विवाह पध्दतीचा अवलंब करण्याची गरज,असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे.
तरुणांनो सत्यशोधक विवाह करा,नव वधू-वरांचे आवाहन
लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर सत्यशोधक पद्धतीच्या मार्गाने लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर नवदांपत्यांना लग्न सोहळा बद्दल आनंद व्यक्त केला आहे. नववधू असणाऱ्या स्नेहलता यांनी प्रत्येक मुलीची इच्छा ही तिचं लग्न धुमधडाक्यात व्हावं, असं असतं पण माझं सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला,त्याचा मला खूप खूप आनंद होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केलं आहे.नवरदेव असणाऱ्या महादेव म्हणाले, आपल्या भूमितील थोर समाज सुधारक यांच्या प्रेरणेतून आपण सत्यशोधक विवाह आपले काका ए.डी.पाटील आणि गायकवाड सर यांच्या माध्यमातून निर्णय घेतला. हा विवाह सोहळा संपन्न झाला.सत्यशोधक पद्धती विवाहाचा मला खूप आनंद होत आहे. प्रत्येक तरुणांनी सुद्धा आपल्या थोर पुरुषांनी आणि समाजसुधारकांनी जो संदेश दिला आहे,त्याप्रमाणे वागले पाहिजे आणि या थोर पुरुषांना व समाजसुधारकांना श्रद्धांजली म्हणुन सत्यशोधक पद्धतीने विवाह केला पाहिजे ,असे आवाहन यावेळी महादेव पाटील यांनी केले आहे.
कोरोना संकटातील आदर्श लग्न..!
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने कोरोना जागृतीचे सामाजिक संदेशही देण्यात आले. शिवाय या सत्यशोधक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात खर्चिक लग्नसोहळा टाळण्याचा एक आदर्शही निर्माण होऊ शकतो.