Satish kalsekar Passed Away : प्रख्यात कवी सतीश काळसेकर यांचं निधन
Satish kalsekar Passed Away : प्रसिद्ध कवी, संपादक सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
![Satish kalsekar Passed Away : प्रख्यात कवी सतीश काळसेकर यांचं निधन Satish kalsekar Passed Away marathi poet satish kalsekar passes away at 78 Satish kalsekar Passed Away : प्रख्यात कवी सतीश काळसेकर यांचं निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/24/cc88f05da883cfb409b22a33bf0b24da_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satish kalsekar Passed Away : मराठीतील प्रख्यात कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, अशी सतीश काळसेकर यांची ओळख होती.
काळसेकरांचा जन्म मुळचा सिंधुदुर्गातील. त्यांचे मूळगाव काळसे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ मासिक ज्ञानदूत आणि टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्यांनी नोकरी केली. यानंतर त्यांना बँक ऑफ बडोदा येथे नोकरी लागली. 1965 ते 2001 म्हणजे सेवानिवृत्ती पर्यंत ते बँक ऑफ बडोदा येथेच कार्यरत होते. काळसेकर यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात काव्य लेखनाने झाली. सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा यासारख्या वर्तमानपत्रातूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. 1971 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला. या कविता संग्रहापासूनच कवी म्हणून त्यांची ओळख ठळक होत गेली.
कवी सतीश काळसेकर यांची साहित्य संपदा इंद्रियोपनिषद् (1971), साक्षात (1982), विलंबित (1997) हे कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आले. तसेच त्यांनी अनेक कवितासंग्रहांचे मराठी अनुवादही केले. 'वाचणाऱ्याची रोजनिशी' या त्यांच्या पुस्तकाला 2014 सालच्या 'साहित्य अकादमी' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. सतीश काळसेकर यांच्या कवितांचा समावेश अनेक महत्त्वाच्या संकलनात झाला आहे. हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी, पंजाबी यासह अन्य भारतीय भाषांत त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत. त्यांनी देशी-विदेशी भाषांतील अनेक महत्त्वाच्या कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. महाश्वेता देवी आणि रस्किन बाँण्ड यांच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत.
'अत्त दीप भव' (वृत्तमानस), 'वाचणाऱ्याची रोजनिशी' (आपले वाङ्मय वृत्त) हे त्यांचे सदर लेखन प्रकाशित आहे. प्रवास लेखन, सांस्कृतिक चळवळी, खाद्यजीवन या सारख्या विषयांवर त्यांनी वेळोवेळी केलेले लेखन नियतकालिकांतून, वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)