मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना
पवनचक्की कंपनीच्या खंडणीप्रकरणात झालेल्या वादातून झालेल्या मस्साजोग हत्याकांडानंतर आता धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.
Dharashiv: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे घडलेल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या हत्याकांडाच्या सूत्रधाराला शोधून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी राज्यातील नेते करताना दिसतायत. पवनचक्की कंपनीच्या खंडणीप्रकरणात झालेल्या वादातून झालेल्या प्रकारानंतर आता धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर धाराशिवचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतली.धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवनचक्की प्रोजेक्ट सुरू असून पोलीस अधीक्षकांच्या बैठकीला 60 ते 70 प्रतिनिधींची हजेरी होती.
पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर
धाराशिवमध्ये पवनचक्की प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर सुरु असून संतोष देशमुख हत्याकांडानंतर प्रशासनही धास्तावलं आहे. बीडच्या शेजारीच असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींना पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी घडणाऱ्या गोष्टींवर नजर राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच पवनचक्की प्रकल्पावरील खासगी सुरक्षा रक्षकांकडून कोणाला दमदाटी होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. शेतकरी, ग्रामपंचायतीच्या प्रश्नांचं योग्य निरसन करा, त्यांनतर अडचणी आल्या तर पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत.
नक्की प्रकरण काय?
केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली. संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली. राजकीय घटनांना वेग येऊ लागला आहे. या प्रकरणात कसून चौकशी करून सूत्रधाराला पकडण्यात येण्याची मागणी बड्या नेत्यांकडून होत आहे.