Sanjay Raut : सरकारकडून हिंदीचा GR रद्द, ठाकरे बंधूंचाही मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
Sanjay Raut Tweet : हिंदीचा जीआर रद्द करून देवेंद्र फडणवीसांनी शहाणपणाचा निर्णय घेतला असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले.

मुंबई : राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीवरुन एक पाऊल मागे घेतलं आणि दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर आता ठाकरे बंधुंच्या मोर्चाचे काय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र आता हा मोर्चा होणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. मराठी माणसाचा धसका सरकारने घेतला, हा मराठी माणसाचा विजय आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
ठाकरे बंधुंच्या 5 जुलै रोजीच्या मोर्चाच्या निमित्ताने मराठी माणसाची ताकद दिसणार होती. पण राज्य सरकारने हिंदीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं होतं. त्यावर संजय राऊतांनी सर्व चित्र स्पष्ट केलं आहे.
Sanjay Raut Tweet : काय म्हटलंय संजय राऊत यांनी?
हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द हा मराठी एकजुटीचा विजय आहे. दोन ठाकरे एकत्र येणार याचा धसका सरकारने घेतला. त्यामुळे 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही. पण.. ठाकरे हाच ब्रँड! फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय आहे.
हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2025
हा मराठी एकजुटीचा विजय,
ठाकरे एकत्र येणार याचा धसका,
५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण..
ठाकरे हाच ब्रँड!
(फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान) pic.twitter.com/eTm1Rei41B
राज्यात पहिलीपासून त्रिभाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामाध्यमातून हिंदी भाषेची अप्रत्यक्ष सक्ती होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे संयुक्तरित्या मोर्चा काढणार होते. 5 जुलैला हा मोर्चा काढण्यात येणार होता. हा मोर्चा भव्यदिव्य कसा होईल यासाठी शिवसेना आणि मनसेकडून प्रयत्न केले जात होते. पण सरकारने हा निर्णयच मागे घेतला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे बंधुंचा संयुक्त मोर्चाही रद्द करण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले. पण मनसेकडून मात्र यावर अद्याप अधिकृत माहिती आली नाही.
हिंदीबाबत सरकारचा जीआर रद्द
सध्या राज्यभर वातावरण तापवणाऱ्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली. हिंदीबाबत त्यांनी दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा केली. दिवसभर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांत ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधी पक्षांनी पहिलीपासून हिंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलनं केली. सरकारचा त्रिभाषा सूत्रीबाबतच्या निर्णयाची जागोजागी होळी करण्यात आली. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं काढलेले दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
ही बातमी वाचा:























