(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : 'करारा जवाब मिलेगा', मंत्री लोढांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर जोरदार टीका केली. राज्याच्या पर्यटनमंत्र्याला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित हवा असे वक्तव्य राऊतांनी केलं.
Sanjay Raut : राज्य सरकारमधील काही लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. यामध्ये राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांचाही समावेश आहे. हे होत असताना महाराष्ट्रातील जनता डोळे बंद करुन गप्प बसणार नाही. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लवकरच 'करारा जवाब मिलेगा' असा इशारा संजय राऊतांनी दिला. संजय राऊत मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
पर्यंटनमंत्र्यांना तरी छत्रपती शिवरायांचा इतिहास माहित हवा
मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. मुंबईचे पालकमंत्री आहेत, पर्यटनमंत्री आहेत. निदान राज्याच्या पर्यटन मंत्र्याला तरी या राज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित पाहिजे. महाराष्ट्रात जगभरातून पर्यटक येतात. हे पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला येतात, त्यांचे किल्ले पाहायला येतात असे राऊत म्हणाले. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मंत्री छत्रपती शिवराय यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य करुन त्यांची तुलना एका पक्षाशी, राज्याशी बेईमानी करणाऱ्या व्यक्तिशी करत असल्याचा टोला राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? राऊतांचा सवाल
भाजपच्या प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना माफिवीर ठरवले, राज्यपालांनी छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं, आता राज्यातील एका मंत्र्यानं छत्रपती शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान केल्याचे राऊत म्हणाले. सध्याचे या खोके सरकारमध्ये कोण छत्रपती शिवरायांचा जास्त अपमान करेल अशी स्पर्धा लागली आहे. त्यांच्यावर दिल्लीनं मोठं बक्षीस लावलंय का? असा सवालही राऊतांनी केला. रोज भाजपचा एक माणूस छत्रपतींचा अपमान करत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 खोके आमदार गप्प आहेत. छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का? असा सवाल राऊतांनी शिंदे सरकारला केला. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? छत्रपतींच्या आग्रा सुटकेची तुलना तुम्ही एका बेईमान व्यक्तिशी करत असाल तर तुम्हाला लवकरच उत्तर मिळेल असे राऊत म्हणाले.
आम्हाला जनतेचा मोठा प्रतिसाद
तुरुंगातून सुटल्यानंतर माझा नाशिकला प्रथमच दौरा आहे. मी उद्या नाशिकला जाणार आहे. त्यानंतर आम्ही महाराष्ट्रातसुद्धा फिरणार आहोत, पण सुरुवात नाशिकपासून होत असल्याचे राऊतांनी सांगितलं. या दौऱ्यात मी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे. आमचे नेते महाराष्ट्रात फिरत आहेत. आम्हाला जनतेचा मोठा प्रतिसाद राज्यात मिळत असल्याचे राऊत म्हणाले.
राज्यपालांच्या विरोधात सरकारनं ठराव करावा
कॅबिनेटने राज्यपालांच्या विरोधात निषेध करणारा ठराव मंजूर करावा. मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहावं, हे तरी तुमच्या हातात आहे ना ? असा खडा सवाल राऊतांनी केला. हे लोक राज्याला मूर्ख बनवत आहेत. ही सगळी मांजरं आहेत. मांजर जरी डोळे बंद करुन दूध पीत असले तरी लोक पाहत असतात असे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: