महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता 8 दिवस झाले, पण अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. विशेष म्हणजे भाजप महायुतीला 237 जागांसह मोठं बहुमत मिळालं आहे. त्यामध्ये, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाला 57 जागा जिंकता आल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या असून सध्या तिन्ही पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री (Chief Minister) आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेले असून भाजप नेते पक्षाच्या पदाधिकारी व आमदाराच्या बैठकी घेत आहेत. त्यामुळे, महायुतीच्या (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे, भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपपदाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.
चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली ऑनलाईन बैठक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये, भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर काय-काय काळजी घ्यायची यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचना सर्व आमदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच, महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले. यासह प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल असेही ठरल्याचं कळतंय
संघाच्या कोअर कमिटीची बैठक
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोअर कमिटीकडूनही महत्त्वाची बैठक घेतली जात आहे. त्यामुळे, राज्यातील सरकार स्थापनेपूर्वी हालचाली गतीमान झाल्या असून भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.
हेही वाचा
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला