राज्यभर सेलिब्रेटी झालेल्या शहाजीबापूंच्या सांगोला तालुक्यात सगळं नॉट ओके; विद्यार्थ्यांनी केला पंचनामा
काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल या डायलॉगनंतर राज्यभर प्रसिद्धी मिळालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) आता निशाण्यावर आले आहेत.
Sangola Shahaji Bapu Patil News: काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल या डायलॉगनंतर राज्यभर प्रसिद्धी मिळालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) आता निशाण्यावर आले आहेत. आता त्यांच्याच मतदारसंघातील शाळकरी मुलांनी आपल्या शाळेची दुरावस्था दाखवत इथे काहीच ओके नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता शहाजीबापूंवर शिवसेनेचे लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका करीत बापू, शाळेतली लहान मुलं देखील आता तुमच्याबद्दल बोलू लागली आहेत, अशा शब्दात सडकून टीका केली आहे.
राज्यभर लोकप्रिय झालेल्या बापूंच्या अडचणी वाढणार?
काल मुंबई आणि ठाण्यात झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात पुन्हा एकदा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल, सगळं ओके म्हणत फिरताना दिसून आले होते. सांगोला तालुक्यातील जुनोनी या गावातील प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीला गेले अनेक वर्षांपासून गटारीच्या पाण्याचा विळखा पडला आहे. अनेकवेळा याबाबत तक्रारी करूनही कोणी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेवटी या शाळेतील मुलांनी शाळेभोवती असणाऱ्या सांडपाण्याने आम्ही सारखे आजारी पडत असून इथे काहीच ओके नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. यामुळं आता राज्यभर लोकप्रिय झालेल्या बापूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.
जरा मतदारसंघात येऊन पाहा, मतदार तुमची वाट पाहत आहेत
राज्यभर तुम्ही सगळे ओके असल्याचे सांगत फिरताय. पण जरा मतदारसंघात येऊन पाहा, मतदार तुमची वाट पाहत आहेत, असा टोला शिवसेनेच्या लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. उद्या शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगोल्यात जाहीर सभा होत असून या सभेत बापू तुमच्या कामाचा आम्ही पंचनामा करु असा इशाराही हाके यांनी दिला आहे. एका बाजूला आता कोणतेही काम थांबणार नाही, असे शहाजीबापू सांगत असले तरी जुनोनीच्या शाळेभोवती असणाऱ्या सांड पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला नाही.
या लहान लहान मुलांना या घाण पाण्यावरून उद्या मारत शाळेला यावे लागते. यामुळे ही लहान मुले सारखी आजारी पडत असूनही याकडे लक्ष द्यायला आमदार शहाजीबापूंना वेळ नसल्याची टीका होऊ लागली आहे. त्यामुळे बापू आता बाहेर सेलिब्रेटी म्हणून फिरणे बास, दोन वर्षांनी पुन्हा विधानसभेला सामोरे जाण्यापूर्वी जरा मतदारसंघातही थोडे ओके वातावरण करा एवढेच सांगणे आहे, अशी देखील टीका होऊ लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Shahaji Patil : सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे 'शहाजीबापू' कोण? पाहा त्यांची राजकीय कारकीर्द