Sangli News : विधवा पुनर्विवाहसह, पुनर्वसनाची जबाबदारी, इनाम धामणी ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांबाबत महत्त्वाचा निर्णय
सांगलीतील इनाम धामणी ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांबाबतीत एक पाऊल पुढे निर्णय घेण्यात आला आहे. विधवा पुनर्विवाहसोबतच त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला आहे.
सांगली : विधवा महिलांना सौभाग्य अलंकार कायम ठेवण्याचा ठराव राज्यातील विविध ठिकाणी होत आहे. यातच मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने यापुढे एक पाऊल टाकत विधवांना पुनर्विवाह करण्यात सहमती देण्याबरोबरच पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. विधवा आणि परित्यक्ता महिलांचा पुनर्विवाह करुन त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ऐतिहासिक अशा प्रकारचा ठराव करणारे इनामधामणी हे राज्यातील पहिले गाव ठरणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडचा आदर्श समोर ठेवत सांगली जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी पुढाकार घेतला. याचबरोबर सांगली महापालिकेच्या महासभेसमोरही हा प्रस्ताव पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे. विधवा महिलांना सौभाग्य अलंकार कायम ठेवण्याचा ठराव केले जात असताना मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने विधवा महिलांना पुनर्विवाह करण्याचा हक्क देऊ केला आहे. याचबरोबर या महिलांना संसारोपयोगी साहित्य देऊन महिलांना पुनर्वसनासाठी मदत करण्यात येणार आहे. सरपंच अश्विनी कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंच अनिता पाटील यांनी विधवांना पुनर्विवाह करण्यास सहमती देण्याचा ठराव मांडला. या ठरावाला सदस्या राजमती मगदूम यांनी अनुमोदन दिले.
पुनर्विवाह करणाऱ्या विधवा महिलांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानासह ग्रामपंचायत स्वनिधीतून संसारोपयोगी साहित्य देणार आहे. या बैठकीला ग्रामविकास अधिकारी रविंद्र शिंदे यांच्यासह सुहास पाटील, महावीर पाटील, अमोल कोळी उपस्थित होते. विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देणारी इनाम धामणी पहिली ग्रामपंचायत ठरली.
विधवा प्रथेविरुद्ध सांगली जिल्ह्यातील बलगवडे, गव्हाण ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर
तासगांव तालुक्यातील बलगवडे ग्रामपंचायतने आणि गव्हाण ग्रामपंचायतकडून देखील मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला आहे. असा ठराव करणारी बलगवडे ही सांगली जिल्ह्यातील पहिली तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे. तर गव्हाण ही सांगली जिल्ह्यातील तिसरी तर राज्यातील सातवी ग्रामपंचायत ठरली आहे. समाजात आजही विधवा महिलांना सामाजिक धार्मिक कार्यक्रमांत मान दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेच्या नुसार महिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार 17 मे रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव करावेत असे आदेश दिले आहेत, त्यानुसार बलगवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा ठराव सर्व सहमतीने मंजूर केला आहे.