(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli, Kolhapur Flood | आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं
नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 187 तर सांगली जिल्ह्यात 117 तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
मुंबई : सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एनडीआरएफ, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमच्या 15 नौदलाचे पथक बोटींसह शिरोळकडे रवाना होत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.
स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 23 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये 2 तर कोल्हापुरात 1 अशी तीन पथके कार्यरत असून याशिवाय विशाखापट्टणमचे 15 नौदलाचे पथक बोटींसह शिरोळमध्ये दुपारी पोहोचत आहेत.आतापर्यंत कोल्हापूर येथील 2 लाख 33 हजार 150 तर सांगली येथील 1 लाख 44 हजार 987 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 74 बोटींद्वारे तर सांगली जिल्ह्यात 93 बोटींद्वारे मदतकार्य सुरु आहे.
नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 187 तर सांगली जिल्ह्यात 117 तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 43 हजार 922 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 249 गावांना पुराचा तडाखा बसला आहे. तर यामुळे जवळपास कुटुंबे 48 हजार 588 कुटुंबांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर सांगली जिल्ह्यातील 108 गावांच पुरांच पाणी शिरलं आहे. यामध्ये 28 हजार 537 कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचाव कार्य सुरु आहे.