एक्स्प्लोर
सांगलीत तीन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, पोलिसांच्या सजगतेने डाव फसला
सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचं अपहरण करुन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. रात्रीच्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून तीन मुलांना एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. त्यावेळी मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सांगली : सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सांगलीतील विश्रामबाग पोलिस आणि सातारा रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे. रात्री अकराच्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून तीन मुलांना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. यावेळी मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी साताऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतलं. अपहरण केलेली मुले सांगलीच्या हनुमान नगर परिसरातील होती. ती कालपासून गायब होती. ही तीनही मुले सुखरुप आहेत. मुलांना फूस लावून त्यांचे अपहरण करुन घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे विश्रामबाग पोलीस अधिक चौकशी करत असून यातून मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
मुलं कालपासून घरी आली नसल्याने हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या तीन घरातील पालकांनी शोधाशोध करत विश्रामबाग पोलिसात तक्रार दिली होती. हनुमाननगर भागातील तीन मुलं रात्री अकरा वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असून सोबत एक संशयित आहे, अशी माहिती सांगलीतील पद्माकर जगदाळे यांना मिळाली होती. फूस लावून हा संशयित मुलांना मुंबईला नेत असल्याचं त्यांनी तात्काळ विश्रामबाग पोलिसांना सांगितलं. यावर विश्रामबागचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सातारा रेल्वे पोलीस आणि सातारा पोलिसांशी संपर्क साधत याची कल्पना दिली. रेल्वे पोलीस आणि सातारा पोलिसांनी तात्काळ त्या माहितीची दखल घेत महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या या व्यक्तीला आणि तीन मुलांना सातारा रेल्वे स्थानकांमध्ये उतरवलं. सांगली पोलीस साताऱ्यात पोहोचेपर्यंत रेल्वे पोलिसांनी मुलांना स्थानकात सुखरुप ठेवलं. या सगळ्या घटनेत पोलिसांबरोबरच सांगलीचे नगरसेवक अभिजित भोसले हे देखील साताऱ्यात गेले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास सातारा रेल्वे पोलीस, विश्रामबाग पोलीस साताऱ्यात पोहोचले आणि तीन अल्पवयीन मुलं आणि त्यांचे अपहरण करणाऱ्याला ताब्यात घेतलं. विश्रामबाग पोलिसांनी या तीनही मुलांचे जबाब नोंदवले असून अपहरणकर्त्याची अधिक चौकशी करत आहेत. सातारा रेल्वे पोलीस आणि विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतल्याने या तीन अल्पवयीन मुलांची सुखरुप सुटका होऊ शकली. या कारवाईत रेल्वे पोलीस विकास भोले, विश्रामबाग पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, पोलीस नाईक आर टी तावरे, पोलीस कॉन्स्टेबल घस्ते आणि रेल्वे पोलीस निरीक्षक मीना आणि इतर कर्मचारी सुनील माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement