(Source: Poll of Polls)
Samruddhi Highway Cracks : समृद्धीवरील भेगांच्या रुपाने प्रवाशांच्या मृत्यूचे सापळे रचण्याचं कारस्थान कुणाचं?
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा देशभरात गाजावाजा करण्यात आला. पण वेगाने जाणाऱ्या वाहनांसमोर भेगांच्या स्वरूपात मृत्यूचे सापळे रचण्याचं हे कारस्थान नक्की कोणाचं?
मुंबई : राज्याच्या विकासाच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बांधला खरा, मात्र या समृद्धीवर आता मृत्यूचे सापळे तयार झालेत. समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं दिसून आलं. अत्यंत धक्कादायक असा प्रकार एबीपी माझाने जगासमोर आणला असून त्याची गंभीर दखलही तातडीने यंत्रणांना घ्यावी लागली.
समृद्धी महामार्ग हा काही साधासुधा महामार्गही नाही. या ठिकाणी गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात. तब्बल 55 हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधण्यात आला. महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं एक वर्ष झालं, तोच या महामार्गाला मोठमोठाले तडे, भेगा पडल्याचं दिसतंय.
छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ 3 सेमी रुंद आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. महामार्गासाठी एम-40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता, पण तो फोल ठरला. माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर असा खड्डा पडला असून कधीही अपघात होईल अशी शक्यता आहे.
समृद्धी महामार्गावरची ही भयानक अवस्था, पुलावरील रस्त्याची अवस्थाही वेगळी नाही. या ठिकाणच्या पुलावर खड्डे पडलेत. एखादं मोठं वाहन तिथून गेलं तर संपूर्ण रस्ता हलतो. पुलावरील या खड्ड्यामुळे भरधाव वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे.
एबीपी माझाच्या या बातमीनंतर चांगलीच खळबळ माजली आणि विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराविषयी मी बोललो होतो. समृद्धी महामार्ग प्रकल्पला टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. भ्रष्टाचार किंवा अतिरिक्त पैसा सरकारचा गेला. या प्रकल्पातून काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाभ मिळाला असावा. गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्यात भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गाच्या खर्चातून झाला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अटल सेतूचा विषय आम्ही मांडला आणि माझी टिंगल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात करत होते. समृद्धीमध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे आणि आता त्याला देखील भेगा पडल्या आहेत. या सरकारला कुठलीही लाज शरम नाही.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रची समृद्धी होण्याऐवजी त्यावेळी निर्णय कोण घेत होता त्यांची समृद्धी झाली. यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचे पैसे कुठे कुठे गेले याची मोठी लिस्ट आहे. एम 40 ग्रेडचा सिमेंट समृद्धीसाठी वापरला म्हणतात तर मग भेगा कशा पडतात. समृद्धीला भेगा, अटल सेतूला भेगा... आम्ही काही बोललो तर म्हणतात की प्रकल्पला तुम्ही बदनाम करताय. पण सत्य तुम्ही का स्वीकारत नाही. जर भेगा पडत असतील तर त्या का पडताय हे सांगा. हा विषय आम्ही सभागृहात मांडणार होतो, पण आम्हाला बोलू दिलं नाही.
आधी एबीपी माझाची प्रसिद्धी आणि मग विरोधकांचा हल्ला बघून यंत्रणाही तातडीनं जाग्या झाल्या. अवघ्या साडेतीन तासांत या प्रकाराची दखल घेत अधिकारी समृद्धी महामार्गावर पोचले आणि डागडुजीला सुरुवात झाली.
पण भेगांमध्ये ज्या पद्धतीनं सिमेंट भरलंय, त्याचा किती फायदा होईल याची शंकाच आहे, हे सारं तकलादू आहे.
एबीपी माझाचे राज्य सरकारला सवाल
- कंत्राटदार कंपनीने रस्त्याचा रोज आढावा घेणं बंधनकारक आहे. तरीही एवढ्या भेगा कशा?
- हा रस्ता बनवणाऱ्या कंपनीने दुर्लक्ष का केलं ?
- या भेगांमुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?
- कामात हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई करणार?
- M-40 ग्रेडचं सिमेंट का वापरलं नाही? कंत्राटदारांच्या कामावर यंत्रणांचं लक्ष नव्हतं का?
कंत्राटदारासोबत झालेल्या करारानुसार चार वर्षांचा म्हणजेच 2026 पर्यंत दोष निवारण कालावधी आहे. त्याअंतर्गत या भेगा भरण्याचं काम केलं जातंय. समृद्धी महामार्गाचा देशभरात गाजावाजा करण्यात आला. पण कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणं ही कोणाची जबाबदारी होती? वेगाने जाणाऱ्या वाहनांसमोर भेगांच्या स्वरूपात मृत्यूचे सापळे रचण्याचं हे कारस्थान नक्की कोणाचं? सरकार खरंच काही कारवाई करणार की भेगा बुजवण्याची थुकपट्टी कामं करून पुढील भेगा पडण्याची वाट बघत बसणार?
ही बातमी वाचा: