(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samruddhi Highway Accident: समृद्धीवर भीषण अपघात, हजला यात्रेसाठी जाणाऱ्या कुटुंबातील चिमुकल्याचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
Samruddhi Highway Accident: या अपघातात एक वर्षांचा चिमुकला जागीच ठार झाला. तर कुटुंबातील अन्य पाचजण गंभीर जखमी झाले आहे.
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) होणाऱ्या अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान शनिवारी (10 जून) पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई येथून बिहारमधील छाप्राकडे निघालेल्या कारला समृद्धी महामार्गावर वैजापुरजवळ जांबरगाव ते लासुरगावदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी येवला येथे हलवण्यात आले आहे. अख्तर रझा (वय 1 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे हज यात्रेला जायचे असल्याने हे कुटुंब गावाकडे जात होते.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळचे छाप्रा (बिहार) मधील छाप्रा येथील असलेले खान कुटुंब सध्या वाशी, नवी मुंबई येथे स्थायिक झालेले आहे. तर गया येथून 17 जून रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते, त्यासाठी ते आपल्या गावी छात्रा येथे जात होते. समृद्धी महामार्गावरुन जात असताना जांबरगाव व लासूरगाव दरम्यान शनिवारी दपारी दोन वाजेच्या समारास चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या उलटली. दुभाजकामध्ये गाडीचे टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे.
या अपघातात गाडी चक्काचूर झाली असून, यात एक वर्षाचा अख्तर रझा हा चिमुकला जागीच गतप्राण झाला. तर कुटुंबातील आझाद अली खान (वय 49 वर्षे), अफताब अली (वय 24 वर्षे), खुशबू आलम खान (वय 26 वर्षे) यास्मिन खान (वय 18 वर्षे), सोहेल आलम खान (वय 30 वर्षे) हे गंभीर जखमी झाले. तर जखमींना नागरिकांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी येवला येथे हलवले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
समृद्धीवरील अपघाताची मालिका सुरुच
दरम्यान समृद्धीवर होणाऱ्या अपघाताची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. जालना जिल्ह्यात सलग तीन दिवस अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात पहिली घटना बदनापूर तालुक्याती बाजार येथे घडली. मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या जीपने उभा असलेल्या ट्रकला धडक दिली. यात अब्दुल मोहम्मद खालिद शेख यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 8 जून रोजी घडली. दुसऱ्या घटनेत चालकाचे नियंत्रण सुटून ईको कारने कंटेनरला पाठीमागून धडकल्याची घटना नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान शनिवारी सकाळीच भरधाव कारने उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने एक तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 357 वर घडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: