(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा आरक्षणावर पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी : संभाजीराजे छत्रपती
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तातडीनं हालचाल करावी आणि पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत. आपल्याला आता कुणाच्या चुका काढायच्या नाहीत. पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. कलम 338 बी मधून पुन्हा मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक झाली. कोल्हापुरातील सर्व समन्वयक या बैठकीला उपस्थित होते. 16 जूनला मराठा समाजाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात येणार आहे त्यावर चर्चा करण्यात आली.
येत्या 16 जून रोजी कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड याठिकाणी सुरुवातीला आंदोलन होईल. 36 जिल्ह्यात आंदोलन केलं जाईल आणि मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर एकदाच जोर लावाण्यात येईल. त्यात पुण्यापासून मंत्रायलापर्यंत लॉंग मार्च काढला जाईल. या मोर्चासाठी सर्व आमदार, खासदार यांचा सन्मान ठेऊन बोलवू.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "येत्या 12 तारखेला कोपर्डीला जाणार काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले जाणार. जे आमदार खासदर येणार नाही त्यांची रिकामी पाटी लावली जाणार. 16 तारखेला आता मूक आंदोलन करण्यात येईल.आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीनी बोलायला हवं. आपली व्हॉट बँक बाजूला जाईल म्हणून कुणी बोलत नाही."
माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्यांशी संबध चांगले असल्याचं सांगत संभाजीराजे म्हणाले की, "माझ्या मराठा समाजासाठी काय करता ते सांगा. मी समाजाची दिशाभूल करणारा नाही, दिशा देणारा आहे. शाहू महाराजांच्या भूमीतून आंदोलन व्हावं अशी भूमिका सर्व समन्वयक यांनी घेतली."
पाच मुद्दे मांडून भूमिका सांगितली पण कुणी किंमत दिली नाही असं सांगत संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "अजित पवार यांनी केवळ फोनवरुन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी राहुल शेवाळे यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत."
महत्वाच्या बातम्या :