Assam : समाजाची संवेदना हरपली! कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्याला पाठीवर घेऊन सुनेवर दोन किलोमीटर पायपीट करण्याची वेळ
सोशल मीडियावर आसाममधील एका महिलेचा फोटो व्हायरल होतोय. त्यामध्ये ती महिला आपल्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्याला पाठीवर घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करताना दिसत आहे. एवढं करुनही तिला आपल्या सासऱ्याचा जीव वाचवता आला नाही.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनेही भयानक वास्तव्य समोर आणलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा गरीबांना बसला आहे या काळात अनेकांच्यातील माणुसकीचा प्रत्यय आला तर अनेकांनी माणुसकी सोडल्याचं दिसून आलंय. आसाम राज्यातील नगांव या गावातील निहारिका दास स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेला तिच्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
निहारिका दास या महिलेच्या सासऱ्याला कोरोनाचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणी मदत करत नव्हते. शेवटी या महिलेने तिच्या सासऱ्याला पाठीवर घेतलं आणि तब्बल दोन किलोमीटरची पायपीट केली. त्यानंतर सासऱ्यासोबत तिलाही रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.
निहारिका दास या आपल्या सासऱ्याला पाठीवर घेऊन जात असताना अनेकांनी त्याचे फोटो काढले, काहींनी त्याचा व्हिडीओ केला आणि सोशल मीडियावर शेअर केले. अनेकांनी हे फोटो शेअर करताना ही आदर्श सून आहे असं कॅप्शन टाकलं. पण या फोटो काढणाऱ्यांपैकी आणि व्हिडीओ शूट करणाऱ्यांपैकी कोणीही तिच्या मदतीला धावलं नाही हे दुदैव. ही घटना 2 जून रोजीची असल्याचं सांगण्यात येतंय.
सासऱ्याचा जीव वाचू शकला नाही
निहारिका दास यांनी दोन किलोमीटरची पायपीट करुन त्यांच्या सासऱ्याला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी तिचे सासरे जवळपास बेशुद्ध झाले होते. पण रुग्णालय प्रशासनाला त्यांच्या सासऱ्याचा जीव वाचवण्यामध्ये अपयश आलं.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus India Cases : देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन मृत्यूंची नोंद, तर गेल्या 24 तासांत 94,052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
- Mumbai Rain : मुंबईतील हवामान विभागाचे रडार अजूनही नादुरुस्तच, पुढील 7 दिवसांत नवे रडार कार्यान्वित होणार, हवामान विभागाची माहिती
- Juhi Chawla Vs 5G Case : 20 लाखांचा दंड आणि हायकोर्टाने फटकारल्यानंतर जुही चावला म्हणाली...