NCP @ 22 : आता करेक्ट कार्यक्रम कोणाचा करणार?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात...
2014 ते 2019 च्या आधीच्या 15 वर्षात महाराष्ट्राने जी चौफेर प्रगती केली आहे, त्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. आजच्या निमित्ताने पक्षासमोरील आव्हानं काय असतील या निमित्ताने एबीपी माझाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली.
मुंबई : . 2014 ते 2019 च्या आधीच्या 15 वर्षात महाराष्ट्राने जी चौफेर प्रगती केली आहे, त्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. तसंच जलसिंचन योजना, ऊर्जा विभागात सुधारणा करण्यात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्रातील हा प्रमुख पक्ष आज 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे. हा पक्ष अनेक वर्ष राज्यात आणि देशात सत्तेत सहभागी होता. आजच्या निमित्ताने पक्षासमोरील आव्हानं काय असतील या निमित्ताने एबीपी माझाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली. यावेळी आगामी निवडणुकीत कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याविषयी देखील विचारण्यात आलं.
1999 साली स्थापनेनंतर पक्ष तातडीने सत्तेत आला. पक्षाच्या नेत्यांच्या खांद्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या. राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारी आमच्यावर पडली. राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी काम करत होतो. सगळ्यांनी साथ दिली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. राज्य दुरुस्त करण्यात यश मिळवलं. जलसिंचन योजना, ऊर्जा विभागात सुधारणा करण्यात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. 2014 ते 2019 च्या आधीच्या 15 वर्षात महाराष्ट्राने जी चौफेर प्रगती केली आहे, त्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत आहे?
राष्ट्रवादी पक्ष अनेक वर्ष सत्तेत होता. परंतु मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची खंत आहे का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, "राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करणं आवश्यक होतं, त्या त्या वेळी झाली. 2004 साली एकदाच प्रसंग आला त्यावेळी आमच्या 72 जागा होत्या. संख्येच्या प्रमाणात आमचा मुख्यमंत्री झाला असता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चेत मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचं मान्य केलं. मुख्यमंत्री झाला असता तर परिस्थिती कितीतरी पटीने चांगली झाली असं वाटतं. भविष्यात पक्षाची ताकद वाढवू असा आम्हाला विश्वास आहे."
अजित पवार, शपथविधी आणि प्रतिमेवर परिणाम?
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला का? यावर जयंत पाटील म्हणाले की, "अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली याबाबत मतमतांतरं होती आणि नक्कीच यामुळे प्रतिमेवर परिणाम झाला. पण नंतरच्या काळात सर्व कार्यकर्ते, नेते पवारांच्या मागे उभे राहिले. अजित पवारसह सर्व जण मागचं सर्व विसरुन एकत्रितपणे आणि एकदिलाने काम करत आहोत. त्याचा फारसा परिणाम पक्षावर झाला असं वाटत नाही."
मुख्यमंत्री-पंतप्रधान भेट
"काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे तिन्ही नेते एकत्रित गेले आणि पंतप्रधानांची भेट घेतली, राज्यातील विषयांवर चर्चा केली. परंतु उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक भेटीत काय झालं हे त्यांनी बाहेर सांगणं अपेक्षित नाही. त्यामुळे त्यांची भेट चांगलं होणं ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. शरद पवारही पंतप्रधान मोदींना भेटतात. अशी भेटी होत राहतात. आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट सकारात्मक पद्धतीने घेणं आवश्यक आहे," असं मत जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर मांडलं.
मराठा आरक्षण
"2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणाचा निर्णय झाला. हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला नाही. हे झाल्यानंतर केंद्र सरकारमध्ये लोकसभेच्या स्तरवर प्रयत्न करणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पंतप्रधानांना भेटण्याचं प्रमुख कारण तेच होतं. त्यामुळे ही लढाई, ही मागणी लोकसभेत धरला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळणं हा आमचा आग्रहच आहे, दुमत कधीच नव्हतं," असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
प्रदेशाध्यक्ष म्हणून आव्हानं
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणती आव्हानं आहेत असं विचारलं असता जयंत पाटील यांनी सांगितलं की, "2024 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाची ताकद कशी वाढेल, ज्या मर्यादित जागेत लढता येतं तिथे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील. महाराष्ट्रातील जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यात अधिक कार्यक्षम कसा होईल आणि सर्व बाबतीत पक्ष सर्वोत्तम कसा होईल यासाठी महाराष्ट्रात ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करु."
अजित पवार की सुप्रिया सुळे?
शरद पवार यांच्यानंतर अजित पवार की सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोण या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, "शरद पवार हे आमचे एकमेव नेते आहे आणि आम्ही एकदिलाने काम करतो. आम्ही पक्ष वाढवण्याचं काम करतोय. त्यामुळे नंबरिंग करण्याची गरज वाटत नाही."
कोणत्या कामाचं समाधान आणि खंत?
"पक्षात अकाऊंटिबिलीटी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, कामाच्या वेगळ्या पद्धती तयार करतोय. सेल्स अधिक अॅक्टिव्ह करण्याचं काम केलं. प्रत्येक तालुक्यापर्यंत पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीच्या वेळी त्याचा परिणाम दिसेल. प्रत्येक तालुक्यात, मतदारसंघात शरद पवारांना, राष्ट्रवादीला मानणारा कार्यकर्ता आहे त्याला बरोबर घेणं आमची जबाबदारी आहे. लवकरच मराठवाडा आणि कोकणाचा दौरा करणार आहे," असं पाटील यांनी सांगितलं.
टप्प्यात आलं की मी करेक्ट कार्यक्रम करतो
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांचं टप्प्यात आलं की मी करेक्ट कार्यक्रम करतो हे वाक्य चांगलंच चर्चेत होते. आगामी निवडणुकीत कोणाचा कार्यक्रम करणार असं विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले की, "याबाबत चर्चा आज करणं योग्य नाही. योग्य वेळ आल्यावर माहिती देईन. महाराष्ट्रात महाविकास आघाडी यशस्वी व्हावी हाच आमचा प्रयत्न आहे. सांगली महापालिकेचं उदाहरण सांगताना जयंत पाटील म्हणाले की, "भाजपचे अनेक नेते माझे संबंधित आहे. याधीची निवडणूक मी त्यांना घेऊन लढलो आहे. सध्या भाजपमध्ये असणारे परंतु पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असणाऱ्या अनेक नगरसेवकांनी ठरवलं आणि त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यात मी काही वेगळं केलं नाही. किंवा दादांना दुखवावं असं मी काही केलेलं नाही."
चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले?
"चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी आहे. कोल्हापुरातील असल्यामुळे जिव्हाळा वाटतो. पण ते आम्हा कोल्हापूर, सांगलीकरांना सोडून पुण्याला गेले याचा मनात थोडा राग आहे. हे पुणेकरांना आवडलं नाहीच पण पुणेकरांनाही आवडेललं नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक संबंधं चांगले आहेत. त्यामुळे मी त्यांच्याविषयी टीका-टिप्पणी करणार नाही. पक्षात कार्यकर्ते टिकले पाहिजे म्हणून 'झोपेत देखील सरकार बदलेल' असं ते सांगतात, मी समजू शकतो. दीड वर्षांपासून सरकार येणार असल्याचं स्वप्न पाहत आहेत. दीड वर्षांपासून त्यांचा स्वप्न बघण्याचा जो कार्यक्रम चालू आहे. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम केलं तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी काम करु शकतात. लक्ष इकडेही नाही तिकडेही नाही असं व्हायला लागलं. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम झालं तर सरकारच्या त्रुटी, चुका निदर्शनास आणून देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा नावलौकिकही वाढेल. एक विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला काम करायचं अशी धारणा त्यांनी पक्की केली पाहिजे," असं जयंत पाटील यांनी सांगितलं.