''लाडकी बहीण योजनेचं कौतुक, पण...''; संभाजी भिडेंनी सरकारकडे व्यक्त केली खंत
मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे संभाजी भिडे यांनी तोंडभरून कौतुक केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उत्तमच असल्याचे त्यांनी सांगितलं.
सांगली : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सध्या सर्वत्र चलती आहे. गावखेड्यातही या योजनेचा बोलबाला असून राज्य सरकारने आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी 7 लाख महिला भगिनींच्या बँक खात्यात 3000 रुपयांचा पहिला हफ्ता जमा केला आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर चार दिवस अगोदरच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे, आमदार, खासदार, सत्ताधारी आणि विरोधकाकंडूनही या योजनेवर भाष्य केलं जात आहे. आता, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत सरकारचं कौतुक केलंय. मात्र, राज्यातील महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरुन सरकारचे कानही टोचले आहेत.
मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे संभाजी भिडे यांनी तोंडभरून कौतुक केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उत्तमच असल्याचे त्यांनी सांगितलं. परंतु, महिलेच्या संरक्षणाचे देखील सरकारनं वचन दिलं पाहिजे. लव्ह जिहाद हा जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा धंदा आहे. एकीकडे महिलांसाठी योजना देण्यात येत असताना महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील सरकारने घेतली पाहिजे, असे म्हणत महिला अत्याचाराच्या घटनांवरुन संभाजी भिडेंनी सरकारचे कानही टोचले आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून तालुका ते राज्य स्तरावर कार्यक्रम घेऊन लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, पुढील 5 वर्षांसाठीची तरतूद आम्ही या योजनेसाठी केल्याचंही मुख्यमंत्री व अर्थमंत्री आपल्या भाषणात सांगत आहेत.
मराठ्यांनी आरक्षण का मागावं?
महाराष्ट्रातील आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे. परंतु हे आरक्षण मराठ्यांनी मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. त्यांनी आरक्षण कुठून काढलंय. मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल. त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. मात्र, हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही, हेच दुर्दैव असल्याचंही संभाजी भिडेंनी म्हटलं. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी वादळ निर्माण झाले असताना मराठ्यांनी आरक्षणच का मागावं असा प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संभाजी भिंडेनी सांगलीत बंद पुकारला
बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अत्याचार होत आहेत. या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट कडकडीत बंद पाळण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील सर्व गावात हा बंद पाळण्यात येईल. या बंद दरम्यान सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात येतील, असे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांबाबत भारत सरकारने तातडीने पाऊले उचलली पाहिजेत. बांगलादेश मधील हिंदूंना तेथेच ठेवून त्यांचे संरक्षण देखील केले पाहिजे, असे देखील संभाजी भिडे यांनी म्हटले. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या वर होत असणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोणतेही नेते बोलत नसल्याचे देखील संभाजी भिडे यांनी म्हटले.
View this post on Instagram
हेही वाचा
नितेश राणे गो बॅक.. हिंदू जनआक्रोश मोर्चात घुसले मराठा आंदोलक, 10 जण पोलिसांच्या ताब्यात
महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी विशाल पाटलांचा हात, जाहीर पाठिंबा