पामतेलाची स्पर्धा शेंगदाणा तेलाशी, इतिहासात पहिल्यांदाच पामतेलाचे भाव शेंगदाणा तेलाइतके!
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचे परिणाम सर्वसामान्यांच्या किचनमध्ये जाणवत आहेत. खाद्यतेलाची आयात बंद असल्याने आणि साठेबाजीची शक्यता पाहता, पामतेल आता चक्क शेंगदाणा तेलाच्या किमतीत मिळायला लागलं आहे.
बुलढाणा : रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अनेक गोष्टींवर परिणाम आता बघायला मिळत आहे. याचे परिणाम आता सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत येऊन पोहोचल्याचं चित्र आहे. भारत खाद्यतेल युक्रेनमधून आयात करतो. आता ही आयातच बंद असल्याने आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याची शक्यता आहे. त्यामुळे एकेकाळी 20 ते 25 रुपये किलोने मिळणारं पामतेल आता चक्क शेंगदाणा तेलाच्या किमतीत मिळायला लागलं आहे. इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचं जाणकार सांगत आहेत.
युद्धाच्या दहाव्या दिवशी ही परिस्थिती, आगामी काळात काय?
ही उलथापालथ युक्रेन आणि रशिया युद्धाच्या सामान्यतः दहाव्या दिवशी बघायला मिळत आहे. हे युद्ध अजून थांबण्याची कुठलीही चिन्हं दिसत नसल्याने आगामी काळात सरकारने यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं बनलं आहे. काही भागात या परिस्थितीचा फायदा व्यापारी साठवणूक करुन घेत असल्याचंही चित्र आहे. सामान्यतः हलक्या प्रतीचं तेल म्हणून आपण पाम, सरकी, सोयाबीन या तेलाकडे बघतो तर उच्च प्रतीचे तेल म्हणून शेंगदाणा, करडी तेल यांच्याकडे पाहतो. म्हणून उच्च प्रतीच्या तेलाचे भाव नेहमीच जास्त राहिलेले आहेत. मागील 40 ते 50 वर्षात आजच्यासारखं कधीच घडलं नव्हतं. कारण आधीच्या काळात सामान्य नागरिक उच्च प्रतीच्या तेलाला प्राधान्य देत असल्याने शेंगदाणा तेलाला मागणी जास्त असल्याने नेहमी भाव तेजीत असायचे. पण आजच्या परिस्थितीत पामतेलाची टंचाई उद्भवल्याने आता पामतेलाची किंमत ही शेंगदाणा तेला इतकची झाली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक झालं आहे. बुलढाण्यातील खामगाव ही मोठी बाजारपेठ आहे आणि खामगावात अनेक तेल निर्मिती करणारे कारखाने ही आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वाढणाऱ्या तेलाच्या भावाचीच चर्चा बाजारपेठेत रंगली आहे.
तेलाचे दर
खाद्यतेल |
27 फेब्रुवारी |
04 मार्च |
शेंगदाणा तेल |
175 रु |
165 रु |
पामतेल |
145 रु |
165 रु |
सूर्यफूल |
160 रु |
175 रु |
सोयाबीन |
155 रु |
170 रु |
सरकी |
155 रु |
164 रु |
सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
24 फेब्रुवारीला युद्ध सुरु झालं. परिणामी आणि युक्रेन आणि राशियातून आयात होणारं खाद्यतेल बंद झालं. त्याचवेळी शेंगदाणा तेलाचीही निर्यात बंद झाली, त्यामुळे शेंगदाणा तेलाचे भाव थोडे कमी होऊन पामतेलाचे भाव वाढले. त्यामुळे शेंगदाणा आणि पामतेल जवळपास सारख्याच भावात आता मिळू लागलं आहे. पण ही झालेली भाववाढ सामान्यांच्या बजेटला धक्के देणारी आहे. कारणे अनेक आहेत पण यावर नियंत्रण मिळवून सरकारने सामान्यांना दिलासा देण्याची मागणी आता होत आहे.