Shivaswarajya Din Celebration | महाराष्ट्रात 6 जूनला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यासाठी नियमावली जारी
महाराष्ट्रात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (6 जून 1674) संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत.
शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची नियमावली
- भगवा स्वराज्यध्वज संहिता ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. हा ध्वज 3 फुट रुंद आणि 6 फुट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
- शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता, शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणुन कमीतकमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान 5 ते 6 फुटाचा आधार द्यावा. आवश्यक साहित्य : सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद कुंकु, ध्वनीक्षेपक.
- 6 जुन सकाळी 9 वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधुन घ्यावा. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुख, समृध्दी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणुन शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा "सुवर्ण कलश" बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहुन त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. तदनंतर राषट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणुन सांगता करावी.
- सुर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवुन द्यावा.
रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार! शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवने, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करुन हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकुम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जातीधर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.