RTMNU Exams : महाविद्यालयस्तरीय परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचं नागपूर विद्यापीठासमोर मोठं आव्हान
गैरप्रकारामुळे अनेक परीक्षा केंद्र रद्द करण्याची नामुष्की ओढविली होती. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयांची जबाबदारी वाढविल्याची चर्चा आहे. या प्रकाराने शिक्षणविश्वातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
![RTMNU Exams : महाविद्यालयस्तरीय परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचं नागपूर विद्यापीठासमोर मोठं आव्हान RTMNU Exam News Update Challenge to prevent malpractice in Nagpur University examinations held at college level Latest marathi news RTMNU Exams : महाविद्यालयस्तरीय परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचं नागपूर विद्यापीठासमोर मोठं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/8a76f5d7b449a11a1ee09a7e5ba504221666242983899440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News : येत्या पाच डिसेंबरपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा (Winter Examinations) होणार आहेत. यावेळी महाविद्यालय स्तरावर लेखी आणि तीन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वीच्या परीक्षादरम्यान घडलेल्या घटनेच्या पूर्वानुभव लक्षात घेता, यंदा विद्यापीठ या परीक्षेवर कसे लक्ष ठेवणार? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
हिवाळी सत्रांच्या परीक्षेत विद्यापीठाने (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) महाविद्यालयांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाविद्यालयांना सर्व बीए, बीकॉम, बीएसस्सी, बीबीए आणि इतर गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एक ते तीन सेमिस्टरच्या (Semister Exams) परीक्षा द्यायच्या आहेत. यावेळी महाविद्यालयांची जबाबदारी वाढवत विद्यापीठाने त्यांना प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारीही दिली.
एमसीक्यू पॅटर्न बंद करण्यात आला असून, महाविद्यालयांना ही परीक्षा 'अॅनॅलिटिकल पॅटर्न' वर द्यावी लागणार आहे. महाविद्यालयातील शिक्षकांना सर्वच पेपरचे मूल्यांकन करून सर्व रेकॉर्ड विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. या सर्व परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांवर टाकून परीक्षा पद्धतीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकतीच बीएससी फिजिक्सची प्रश्नपत्रिका शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे समोर आले होते.
मात्र, प्रश्न पत्रिका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरलत झाल्यावरही यावर कुठलीही कारवाई विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. अशा स्थितीत महाविद्यालयीन स्तरावरच प्रश्नपत्रिका तयार होत असतील, तर त्यांच्या गोपनीयतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन काय करणार, हेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे गेल्या उन्हाळी परीक्षा सत्रात नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयातच परीक्षा केंद्र दिले होते. त्यातच परीक्षेचा बोजवारा उडाला होता. त्यातून विद्यापीठाला अनेक महाविद्यालयातील पेपर रद्द करावे लागले. तसेच अनेक परीक्षा केंद्रच रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे यापूर्वीचे कटू अनुभव आल्यावरही विद्यापीठाने महाविद्यालयांची जबाबदारी वाढविल्याचे चित्र दिसून येते. या प्रकाराने शिक्षणविश्वातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मर्जीच्या कंपनीच्या नियुक्तीसाठी खेळ?
रातुम नागपूर विद्यापीठात एमकेसीएल कंपनीकडे प्रथम वर्षाच्या परीक्षांची जबाबदारी दिली होती. मात्र, त्यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. मात्र काम काढून घेण्यापूर्वी विद्यापीठाने पर्यायी व्यवस्था केली नव्हती. एमकेसीएल कंपनी आणि विद्यापीठाच्या वादामुळे परीक्षा रखडली होती. काम काढून घेतल्यानंतर विद्यापीठही परीक्षा घेण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यातूनच या परीक्षांचा बोजा महाविद्यालयांवर टाकण्यात आला असल्याची चर्चा विद्यापीठात सुरु आहे.
ही बातमी देखील वाचा
Nagpur Crime : लिंकवर क्लिक करणे तरुणीला पडले महागात, तिच्यासह आई-वडिलांचे खातेही रिकामे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)