अज्ञात ठिकाणचा सोन्याचा हंडा शोधण्याचा ईडीचा प्रयत्न; 9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवारांनी काय म्हटलं?
Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची तब्बल नऊ तास ईडी चौकशी सुरु होती. दरम्यान यामध्ये माझा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
मुंबई : कोणीतरी सांगितलं की शहरात कोणत्या तरी ठिकाणी सोन्याचा हंडा लपला आहे, तो शोधण्याच काम सुरू असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे. मला जी कागदपत्रे अधिकाऱ्यांनी मागितली होती ती सर्व मी त्यांना दिली आहेत. त्यांनी बरेच प्रश्न मला विचारलेत. काही नवीन प्रश्न आले. सध्या इतकीच चांगली गोष्ट आहे की, आज मला तुमच्या सोबत बोलायला दिलंय, असंही रोहित पवारांनी म्हटलं.
आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकघोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी ईडीने तब्बल नऊ तास रोहित पवार यांची चौकशी केली होती. दरम्यान रोहित पवार यांची ईडी चौकशीची ही दुसरी फेरी आहे. रोहित पवार यांची चौकशी झाल्यानंतर ते बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ माजला. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत त्यांची पत्नी कुंती पवार, सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे तसेच शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं.
यामध्ये माझा काहीही संबंध नाही - रोहित पवार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ज्यांना कर्ज दिलं आणि परतफेड झाली नाही म्हणून पीआयएल केलं त्यामध्ये कुठेही माझं नाव नाही. ईओडब्ल्यु यांनी यांची चौकशी केली. 19 जानेवारी रोजी समन्स आलं आणि दुसऱ्या दिवशी इओडब्लू यांनी क्लोजर रिपोर्ट कोर्टात दिला. मात्र कोणीतरी सांगितलं की सोन्याचा हंडा लपला आहे. ते शोधण्याचं काम सध्या सुरु आहे. अधिकारी त्यांचं काम करतायत, ते चुकतात असं म्हणणार नाही. मी देखील प्रामाणिकपणे मदत करत आहे, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं.
जर काही विचारायचे असेल तर ते बँकेला विचारावे - रोहित पवार
जर बँकेच्या संदर्भात काही विचारायचं असेल तर ईडीने ते बँकेला विचारावं. मी त्या बँकेवर नव्हतो तर प्रशासक होते, असंही रोहित पवार यांनी म्हटलं. रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकघोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा :
Rohit Pawar ED : नऊ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर