सोलापुरात रेमेडेसिविरची हेराफेरी? माजी सैनिकाने जाब विचारताच 3 इंजेक्शन केले परत
काही ठिकाणी अद्यापही रुग्णांची लूट करण्याचा प्रयत्न खासगी हॉस्पिटल करताना दिसत आहेत. सोलापुरातील एका माजी सैनिकाला आलेला अनुभव तर धक्कादायक आहे.
सोलापूर : कोरोनाशी लढताना आता जवळपास 6 महिने पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही डॉक्टरांची अर्थात रुग्णालयांची आहे. नोबेल प्रोफेशन समजलं जाणाऱ्या वैद्यकीय सेवेमध्ये अनेक डॉक्टरांनी आदर्श कामगिरी केली. मात्र काही ठिकाणी अद्यापही रुग्णांची लूट करण्याचा प्रयत्न खासगी हॉस्पिटल करताना दिसत आहेत. सोलापुरातील एका माजी सैनिकाला आलेला अनुभव तर धक्कादायक आहे. यामुळे राज्यात तुटवडा असलेल्या रेमेडीसिविर औषधाचा काळाबाजार होतोय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुळचे सोलापुरचे असलेल्या सुधाकर देशमुखांनी जवळपास 17 वर्ष सैन्यात राहून देशाची सेवा केली. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पोलिस म्हणून देखील त्यांनी काही काळ सेवा बजावली. सैन्यातल्या त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक मेडल्सनी देखील त्यांचा गौरव करण्यात आला. 16 सप्टेंबर रोजी माजी सैनिक सुधाकर देशमुख यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आणि रुग्णालयाची भयानक चेहरा दाखवणारा प्रकार त्यांच्या समोर आला.
सुधाकर देशमुख यांचा मुलगा दिवसभर आपल्या वडीलांसाठी कुठेतरी बेड मिळेल का याची शोधाशोध करत होता. अनेक प्रयत्नांनतर कसं बसं एका सहकारी रुग्णालयात बेड मिळाला, मात्र इथं देखील त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. रेमेडिसिवीर औषधाबाबत त्यांना एक धक्कदायक अनुभव त्यांना या ठिकाणी आला. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना रेमेडेसिवीर औषधाचा वापर केला जातो. सुधाकर देशमुख यांना रोज एका डोसची आवश्यकता होती. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्रित 6 इंजेक्शन खरेदी केले. रोज एक इंजेक्शन हवं असताना अतिरिक्त इंजेक्शन का खरेदी करण्यात आले असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला. रुग्णालयात मध्यरात्री झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या रुममधून 3 इंजेक्शन नेण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी या सगळ्याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी तात्काळ 3 इंजेक्शन परत देखील केले. मात्र अशा पद्धतीने किती रुग्णांकडून अतिरिक्त इंजेक्शन खरेदी का केले जातात. असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
सुधाकर देशमुख याचं मेडिकल इन्शुरन्स असल्याने त्यांना पैसे भरण्याची आवश्यकता भासली नाही. मात्र अशा पद्धतीने अतिरिक्त इंजेक्शन खरेदी करुन फसवणूक तसेच खरेदी केलेल्या इंजेक्शनाचा काळाबाजार होतो का? असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. सुधाकर देशमुख यांना 25 सप्टेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी त्यांनी रुग्णालयाकडे सविस्तर बिलाची छायांकित प्रत मागितली. मात्र इन्शुरन्स असल्याने बिलाची प्रत देता येणार नाही असे उत्तर रुग्णालयाने दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान या प्रकरणात रुग्णालयाची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही रुग्णालयाशी संपर्क केला. आपण सविस्तर माहिती घेऊन सांगू अशी प्रतिक्रिया यावेळी रुग्णालयातर्फे देण्यात आली. मात्र जवळपास 6 तास उलटल्यानंतर देखील रुग्णालयातर्फे कोणतीही माहिती मिळाली नाही.
12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. सुरुवातीला फक्त शासकीय रुग्णालयात उपचार होत होते. मात्र रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्याच्या सुचना दिल्या. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अनेक रुग्णांच्या भरमसाट बिलाबाबत तक्रारी येत होत्या. रुग्णांची लूट होऊ नये यासाठी शासनाने कशापद्धतीने दर आकारले जावे हे निश्चित केलं. सोबतच खासगी रुग्णालयांची बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. 26 जुलै ते 22 सप्टेंबर पर्यंत सोलापूर शहरात खासगी रुग्णालयात जवळपास 1500 रुग्णांनी उपचार घेतले आहेत. खासगी रुग्णालयांनी या रुग्णांना 12 कोटी 70 लाख 363 रुपयांची बिले दिले होती. मात्र लेखा परीक्षकांनी या सर्व बिलांची तपासणी केला असती या मध्ये तफावत आढळली. आतापर्यंत जवळपास 87 लाख 46 रुपयांची तफावत लेखापरीक्षकांनी निदर्शनास आणून दिली. रुग्णालयांनी देखील हे बिल कमी करुन दिल्याने रुग्णांना मोठा दिलासा यामुळे मिळाला असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त तथा कोव्हिड कंट्रोल रुमचे सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी दिली. उपलब्ध माहिती ही केवळ 26 जुलैनंतरची आहे. त्या आधी खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून किती पैसे घेतलेत हा मात्र संशोधनाचा विषय आहे.