गणपतीपुळे येथे बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचवले; पर्यटकांनो कोकणातील समुद्र किनारी ही घ्या काळजी!
रत्नागिरीतील समुद्रकिनारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान दोन बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिक आणि जीवरक्षकांनी या दोघांना वाचवलं आहे.
रत्नागिरी : लांबच लांब समुद्रकिनारा. नीळंक्षार पाणी, नारळी - पोफळीच्या बागा असं म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती कोकणची भूमि! प्रत्येकाला भुरळ घालणारी अनेक ठिकाणं कोकणात आहेत. या ठिकाणी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात दाखल होतात. समुद्रात अंघोळ करत फुल टू एन्जॉय करतात. यावेळी काही दुर्घटना घडत काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. दरम्यान, रत्नागिरीतील समुद्रकिनारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान अशीच घटना घडली असून दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिक आणि जीवरक्षकांनी या दोघांना वाचवलं आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली असून पुढील उपचाराकरता त्यांना रत्नागिरी जिल्हा रूग्णालय येथे हलवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं हे दोघे पर्यटक बुडत होते. त्यावेळी त्यांना स्थानिकांना प्रसंगावधान राखत वाचवले. हे पर्यटक नेमके कुठले होते? त्यांचं नाव, गाव काय याबाबत ठोस अशी माहिती मिळालेली नाही.
या चुका टाळा समुद्रात अंघोळ करण्याचा मोह कुणालाही टाळता येत नाही. पण, मग म्हणून आपला जीव त्याकरता धोक्यात घालणार का? हा प्रश्न आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांमध्ये अनेक जण पट्टीचे असतील देखील. पण, नदी, ओहळ, विहीर आणि समुद्र यांच्या पाण्यात आणि त्याठिकाणी पोहोण्याच्या तंत्रात काहीसा तरी फरक असणार ही बाब प्रत्येकानं ध्यानात घेतली पाहिजे. अनेक वेळेला पर्यटकांना अतिउत्साहीपणा देखील यासाठी कारणीभूत ठरतो. आपल्या सहकाऱ्यांचं किंवा स्थानिकांच्या म्हणण्याला न जुमानता समुद्रात एका ठराविक अंतराच्या पुढे अंघोळीला जाणं जावीवर बेतू शकते. ही बाब सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे. त्यामुळे 'गया भान, गयी जान' ही बाब ध्यानात ठेवूनच आपण समुद्रात अंघोळ केली पाहिजे. कोकणातील समुद्रकिनारे हे खोल आहेत. अनेक वेळेला आपल्याला या ठिकाणच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज देखील येत नाही. त्यामुळे अशा वेळी पाण्याचा जाण्याचा मोह टाळणं गरजेचं. अन्यथा या मोहापायी मोठा अनर्थ होऊ शकतो. पाण्याचा अंदाज येत नसल्यानं समुद्राच्या पाण्यात जाणं टाळणं यासारखा दुसरा शहाणपणा कोणताही नाही. बऱ्याच वेळा आपण समुद्रकिनारी लावलेल्या फलकांकडे दुर्लक्ष करतो. स्थानिक असोत किंवा समुद्रकिनारी तैनात असलेले सरक्षारक्षक यांच्या सल्ल्याकडे देखील आपण कानाडोळा करतो. त्यामुळे या साऱ्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला परवडणारे नसेल ही बाब देखील ध्यानात घेणे गरजेचं आहे.
येवा कोकण आपलाच असा! कोकण भूमित तुमचं स्वागत, येवा, कोकण आपलाच असा ! अशा आपुलकीनं प्रत्येक पर्यटकाचं स्वागत केले जाते. पण, यावेळी समुद्रात अंघोळ करताना सारे नियम, सुचना यांचं पालन होणे गरजेचे आहे. कारण तुमची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे या साऱ्याबाबींकडे दुर्लक्ष करू नका!