...तर शिवस्मारकाची उंची वाढवण्याचा पुनर्विचार करु : विनायक मेटे
अरबी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 210 मीटर उंचीचा आहे. तर अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर प्रभू श्रीरामाचा 221 फूट उंची असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवरायांचा पुतळा जगात सर्वात उंच असावा अशी तमाम शिव प्रेमींची भावना आहे. त्यामुळे अयोध्येत श्रीरामांचा पुतळा 221 मीटरचा होत असल्यास शिवस्मारकाची उंचीचा पुन्हा पुनर्विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
"उत्तर प्रदेशमध्ये प्रभू श्रीरामाची 221 मीटरची भव्य मूर्ती उभारली जाणार असल्याची माहिती मी वर्तमानपत्रात वाचली. यामध्ये तथ्य असेल तर अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उंचीबाबतही पुर्नविचार आम्ही करु आणि पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी सरकारकडे करु. शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यामुळे जगातील सर्वात उंच पुतळा त्यांचा असावा अशी सर्व शिवप्रेमींची भावना आहे", असं विनायक मेटे म्हणाले.
जालन्यात शिवसंग्रामच्या जिल्हा मेळाव्याला उपस्थित होते. त्यावेळी भाषणात बोलताना मेटेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अरबी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 210 मीटर उंचीचा आहे. तर अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर प्रभू श्री रामाचा 221 फूट उंची असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी हे जाहीर केले होते. मुर्तीची उंची 151 मीटर असली तरी मुर्तीवरील छताची उंची 20 मीटर तर मुर्तीसाठी 50 मीटरचा पाया असणार आहे. त्यामुळे पुतळ्याची एकूण उंची 221 मीटर असणार आहे.
संबंधित बातम्या
अयोध्येतील 151 फूटी रामाची मूर्ती साकारण्यामागे मराठी शिल्पकाराचे हात