(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेशन दुकानदारांनी 1 सप्टेंबरपासून धान्य वितरण बंदच्या निर्णयात 100 टक्के सहभागी व्हावे : अशोकराव कदम
रेशन दुकानदारांनी एक सप्टेंबरपासून 'धान्य वितरण बंद'च्या निर्णयात 100 टक्के सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा रेशनिंग आणि केरोसिन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केले आहे.
चिपळूण : कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन थेट पावतीद्वारे अथवा धान्य दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरीत करण्यासाठी पुन्हा आदेश काढावेत. अन्यथा 1 सप्टेंबरपासून राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार धान्य वितरण करणार नाहीत, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग आणि केरोसिन चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना काही दिवसांपूर्वी दिलेल्या निवदेनाद्वारे दिला होता. मात्र, याकडे शासन-प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रेशन दुकानदारांनी एक सप्टेंबरपासून 'धान्य वितरण बंद'च्या निर्णयात 100 टक्के सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केले आहे.
यावेळी अशोकराव कदम म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी असताना राज्य शासनाचे आदेश सप्टेंबर महिन्यापर्यंत एजन्सी धारकांचे अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वाटप करण्याचे होते. परंतु नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 1 ऑगस्टपासून ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वाटप करण्याचे आदेश मिळाल्याप्रमाणे सध्या जिल्ह्यात वाटप चालू आहे. परंतु, सदरचे वाटप करीत असताना एजन्सी धारकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उदाहरणार्थ सर्वर बंद पडला तर मशीन बंद मशीन बंद पडले की, ग्राहकांची रांग तशीच राहते. कनेक्टिव्हिटी नसली तरी ग्राहकांना उभे करून ठेवावे लागते आणि एजन्सी धारकाला गर्दीला सामोरे जावे लागते. एका बाजूला आपल्या मार्फत सूचना आहेत की, गर्दी टाळा, सुरक्षित अंतर राखा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा आणि हात स्वच्छ ठेवा. या सगळ्या सूचनांचा वापर ग्राहकांकडून होत नाही.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या अवस्थेत धान्य दुकानदारांनी आतापर्यंत प्रशासनाला सहकार्य देऊन विनातक्रार धान्याचे वाटप केले आहे. या पुढील काळात धान्याचे वाटप विनातक्रार सुरळीतपणे जिल्ह्यातील एजन्सी धारक करतील, पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अन्न नागरी पुरवठा खात्याचे प्रधान सचिव यांना संपर्क करून एजन्सी धारकाचे अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वाटपाचे आदेश ऑगस्ट महिना अखेरपर्यंत मिळावेत,अशी मागणी संघटनेतर्फे केली होती. ऑल महाराष्ट्र रेशनिंग फेडरेशन मार्फत केंद्र सरकार व राज्य सरकार यांना वेळोवेळी राज्यातील रेशनिंग दुकानदारांच्या अडचणींबाबत निवेदने देऊन आणि फोनद्वारे चर्चा करूनसुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करून धान्य दुकानदारांचा अपमान करीत आहेत,अशी आमची भावना झाली आहे. तसेच शासनामार्फत दुकानदार व मदतनीस यांना विमा संरक्षण देण्यात यावे. मागील चार महिन्यांचे रेशन दुकानदारांना धान्यवाटप कमिशन त्वरित मिळावे. कोरोना साथीमध्ये आजपर्यंत राज्यात 20 ते 25 रेशन दुकानदार मृत्यूमुखी पडले असून रेशन दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून सोशल डिस्टनशिंगचा वापर करून दुकानदारांचे आधार अभीप्रमाणित करून पास मशीनद्वारे धान्य वितरण करण्याची मुभा कोरोना संपेपर्यंत शासनाने परवानगी द्यावी.अन्यथा राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार एक सप्टेंबरपासून धान्य वितरण करणार नाहीत असा इशारा आम्ही संघटनेतर्फे निवेदनाद्वारे दिला होता.
मात्र, शासन प्रशासनाने संघटनेच्या या निवेदनाकडे दुर्लक्ष केले असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी नमूद करत गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या इशार्याप्रमाणे 1 सप्टेंबर पासून धान्य वितरण बंद'चा निर्णय ठाम असल्याचे स्पष्ट केले असून रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी या बंदमध्ये शंभर टक्के सहभाग घ्यावा, असे आवाहन अशोकराव कदम यांनी शेवटी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात कुलगुरू समितीची बैठक, उद्या निर्णय घेणार : उदय सामंत
आशा वर्कर्सवर कोरोनाची टांगती तलवार, रोज मानधन मिळते फक्त 33 रुपये!