एक्स्प्लोर
नाणार प्रकल्पाविरोधात संघर्ष समिती नारायण राणेंच्या भेटीला
नाणार प्रकल्पाच्या प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली असून सविस्तर बोलणी सुरु आहे

रत्नागिरी : शिवसेनेचा विरोध डावलून फडणवीस सरकारने रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र आक्रमक झालेली प्रकल्पविरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या भेटीसाठी पोहोचले. पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर काल नवी दिल्लीत सह्या झाल्या. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली असून सविस्तर बोलणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असं सांगण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
आणखी वाचा























