राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेला आरोप चुकीचा, तो केवळ अनुवाद; रणजीत सावरकर
Rahul Gandhi: स्वा. सावरकर यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज हा इतर कैद्यांच्या सुटकेसाठी होता. त्यांनी त्या अर्जात ही माझी माफी आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही असं रणजीत सावरकर यांनी स्पष्ट केलं.
मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र वाचून, खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे होते. कारण सावरकरांच्या इंग्रजी पत्राचा मुळात त्यांनी केलेला अनुवादच चुकीचा होता, असं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
राहुल गांधी यांनी अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचं पत्र दाखवून त्यांच्यावर पुन्हा काही वादग्रस्त आरोप केले होते. त्याविषयी खुलासा करताना रणजीत सावरकर म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज हा इतर कैद्यांच्या सुटकेसाठी होता. त्यांनी त्या अर्जात ही माझी माफी आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. मी नोकर व्हायला तयार आहे, हे राहुल गांधींनी उच्चारलेलं वाक्य सावरकरांच्या मूळ पत्रात नाही. राहुल गांधींनी पत्राचा चुकीचा अनुवाद केला."
सावरकरांच म्हणणं होतं की क्रांतीकारकांनी जेलमध्ये खितपत पडणं योग्य नाही. तुम्ही सुटका करून घ्या आणि पुन्हा देशासाठी लढा. सावरकरांना इंग्रजानी सोडलं नव्हतं, कारण इंग्रजांचं म्हणण होतं की सावरकर जर बाहेर पडले तर महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी पेटेल, असंही रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं
रणजीत सावरकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप होतात त्याचे स्पष्टीकरण व्हावे. अंदमानमध्ये नियम होता की कुठलाही कैदी आला तर त्याला सहा महिने बॅरकमध्ये ठेवलं जातं. मात्र 13 वर्षे सावरकर आणि त्यांच्या साथीदारांना बॅरकमध्ये ठेवलं गेलं. ब्रिटिश सावरकरांना क्रांतिकारक मानत नव्हते. ते म्हणायचे तुम्ही सामान्य कैदी आहेत. सर्व कष्टाची काम सावरकर करत होते. 1914 मध्ये त्यांनी दुसरा अर्ज केला की आता महायुद्ध आहे त्यामुळे सर्वाना सोडा. पण तुम्हाला माझ्याबद्दल शंका वाटत असेल तर तुम्ही मला सोडू नका.
रणजीत सावरकर पुढे म्हणाले की, सावरकरांची सुटका झाल्यानंतर त्यांना 1921 साली देशात आणलं आणि रत्नागिरीच्या कोठडीत ठेवले. पण गांधीजींनी 1921 आणि 1030 सालचे आंदोलन मागे घेतले तो देशद्रोह नव्हता का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर यांच्या अनेक परिषदा झाल्या आणि त्यांना गांधींचा विरोध होता. सावरकर हे नेहमी सांगायचे, तुम्ही सैन्यात घुसा. वेळ आली तर बंदुकीची टोके कुठेही फिरवता येतील
भारत सोडताना भारताची फाळणी करायचे हे ब्रिटिशांचे ठरले नव्हते, अखंड हिंदू राष्ट्र हवं असे सावरकर यांना वाटत होतं आणि त्यासाठी काम करत होते असं रणजीत सावरकर म्हणाले. त्यांनी फाळणीला विरोध केला पण हे पाप नेहरूंनी केले. युद्ध सुरू होते तेव्हा नेहरू मंत्रीमंडळ बनवण्यात व्यस्त होते. लॉर्ड माउंटबॅटन आणि नेहरूंची मैत्री मरेपर्यत राहिली.