'शरद पवारांना मिळाली आहे तुतारी, पाहुयात गावागावात...'; चिन्हाच्या अनावरणावर रामदास आठवलेंची खास कविता
Ramdas Athawale : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावर रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.
Ramdas Athawale : शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता आरपीआयचे प्रमुख व केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या खास शैलीत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) मिळाली आहे तुतारी, पाहुयात गावागावात किती ऐकणार त्यांचं म्हातारी, अशा कवितेतून प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचे चिन्ह गेले हे त्यांच्यामुळेच गेले आहे, ते जर NDA सोबत आले असते तरी त्यांचा पक्ष ही एकत्र राहिला असता. या आधी देखील शरद पवार यांनी पुलोद सरकारवेळी जनसंघसोबत युती केलेली होती, असेही त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी मला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली
2014 साली उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्या सोबतच केंद्रात अवजड उद्योग मंत्री पदाची ही ऑफर होती. मात्र भाजपने मला राज्यसभेवर पाठवले होते. त्यावेळी शिवसेनेने युती तोडली नसती आणि 2019 उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले नसते तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला नसता, असे रामदास आठवले यांनी म्हटले.
सोलापूर, शिर्डी लोकसभा आरपीआयला मिळावी
येत्या काळात लोकसभा निवडणुका आहेत. युतीला 400 जागा मिळतील. 2014 पेक्षा जास्त जागा 2019 ला मिळाल्या आहेत. विविध राज्यातील निवडणुकांमध्येही भाजप पुढे आलेले आहे. आरपीआयला राज्यात मंत्री मिळावे अशी आमची मागणी होती, पण विस्ताराच्या आधीच अजित पवार आले. पण अजून ही वेळ गेलेली नाही. सोलापूर आणि शिर्डी लोकसभा आरपीआयला मिळावी ही आमची मागणी आहे. शिर्डी लोकसभेत मी उमेदवार असेन आणि सोलापूर लोकसभेसाठी राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी देण्यात यावी. या संदर्भात अमित शाह, जे पी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत पहिल्यांदा पाठिंबा आम्हीच दिला
नरेंद्र मोदींची भूमिका ही बाबासाहेब यांच्या संविधान मजबूत करणाऱ्या भूमिकेसारखी आहे. काही लोकं म्हणतात ते संविधान बदलण्याचा प्रयत्न करतायत मात्र संविधान कोणाच्या बापाला बदलता येणारं नाही. कायदामध्ये दुरुस्तीचा अधिकार संविधानानेचं दिलाय. त्यानुसार काही कायदे होत आहेत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत पहिल्यांदा पाठिंबा आम्हीच दिला आहे. मराठा समाजातील काही जण जमीनदार आहेत. हे जरी मान्य असेल तरी ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्यांना आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, पण...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्रीय पातळीवरती क्षत्रिय ओबीसी अशा पद्धतीची वेगळी कॅटेगरी त्यासाठी तयार करावी लागेल. जेणेकरून देशभरातील पाटीदार-जाट-मराठा या विविध क्षत्रिय समाजाला ओबीसी कॅटेगिरीमधून आरक्षण देणे शक्य होईल. जरांगे पाटील यांनी आंदोलन करू नये, त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. माझी भूमिका आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, पण ते ओबीसीतून देण्यात येऊ नये.
ओबीसीमध्ये सब कॅटगिरी करण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु
जे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतून मिळेल. पण पश्चिम महाराष्ट्रमध्ये जी मागणी होतेय त्यानुसार त्यांना ओबीसीतून मिळणार नाही. कालेकर आयोगाच्या नुसार 52 टक्के ओबीसी आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचं असेल तरी त्यांना 52 टक्के द्यावे लागेल. पण सर्वोच न्यायालयाने ते 27 टक्के द्यावे असे सांगितले, त्यामुळे ओबीसी म्हणतात आम्हाला आधीच आरक्षण कमी आहे. ओबीसीमध्ये सब कॅटगिरी करण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे.
जातीय जनगणना होणे गरजेचे
प्रत्येक जातींचे किती प्रमाण आहे ते समोर येण्यासाठी जातीय जनगणना होणे गरजेचे आहे. आमची (मागासवर्गीय) लोकसंख्या देखील आता वाढली आहे, त्यामुळे आमची मागणी आहे की, आमचं आम्हाला द्या नंतर राहिलेलं सगळं तुम्ही वाटून घ्या, असे ते यावेळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत यावे
वंचित आघाडीचे सुरु आहे तळ्यात-मळ्यात, बघुयात ते जातात कोणाच्या गळ्यात, अशीही कविता रामदास आठवले यांनी यावेळी केली. प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहेत. महाविकास आघाडीमध्ये ते जाण्यासाठी तयार आहेत पण त्यांना अजून घेतलेलं नाही. त्यांनी एवढा अपमान सहन करण्यापेक्षा सरळ आमच्यासोबत यावे, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवावी, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी! मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला; 4 कामगार जखमी