Ram Navami 2022 : शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ; मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, पालख्यांच्या आगमनाने साईनगरीत उत्साह
Ram Navami 2022 : शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे.
Ram Navami 2022 : शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गेली दोन वर्ष असलेले निर्बंध हटविण्यात आल्याने यावर्षी राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. रामनवमी निमित्त शिर्डीत 40 हजार स्क्वेअर फूट आणि 10 टन रांगोळी वापरून साईबाबांची प्रतिमा साकारली जात असून दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यावर्षी उत्सवास परवानगी मिळाल्याने शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. आज पहाटे साईबाबांच्या काकड आरती आणि पादुकांच्या मिरवणुकीने उत्सवाला सुरूवात झाली आहे. रामनवमी उत्सवाचा मोठा जल्लोष शिर्डीत सुरू आहे. साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
साईबाबांना श्रीराम स्वरूप मानणारे लाखो भक्त शिर्डीत दाखल होता आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. पहाटे साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर साईबाबा संस्थान अध्यक्ष आशुतोष काळे आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत साईबाबांच्या पादुका आणि फोटोच्या मिरवणुकीने उत्सवाला सुरूवात झाली. उद्या (रविवारी) रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असून आलेल्या सर्व साईभक्तांना बाबांचे दर्शन मिळावे यासाठी साईभक्तांच्या सुरक्षेची, राहण्याची, भोजनाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात येत आहे.
साईबाबा हयात असताना देखील हा उत्सव मोठा उत्साहाने साजरा करत होते. आजही साई संस्थान आणि गावकरी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. तीन दिवस अनेक कार्यक्रमाची रेलचेल शिर्डीत असते. पंढरपूर प्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाचा गजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाला मोठी रंगत आली आहे..
दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कुस्ती स्पर्धा, तमाशा, दीड एकरवर साकारणारी साईंची रांगोळी हे उत्सवाचं प्रमुख आकर्षण असणार आहे. शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने साईनगर येथील मैदानावर रांगोळी साकारली जात असून मुंबई येथील 35 कलाकार यासाठी परिश्रम घेत साईंच्याचरणी आपली सेवा देत आहेत. 10 टन रांगोळी गुजरात येथून आणण्यात आली असून उद्या सकाळी ही रांगोळी पूर्ण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ram Navami 2022 : रामनवमीचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
- Ramadan 2022 : रमजाननिमित्त खजूरचा बाजार फुलला, कसा ओळखायचा ओरिजनल खजूर?
- Important Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha