Rajya Sabha Election 2022: मराठीद्रोही भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा; माकपने जाहीर केली भूमिका
Rajya Sabha Election 2022: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
Rajya Sabha Election 2022: महाराष्ट्रातील 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्राला त्याच्या संविधानिक वित्तीय हक्कापासून वंचित ठेवत आपल्याला सत्ताभ्रष्ट केल्याबद्दल भाजप मराठी जनतेला शिक्षा करत आहे. त्याशिवाय भाजपकडून राज्यातील सामाजिक सौहार्द उद्धवस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. विधानसभेत पक्षाचा एक आमदार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी लहान पक्ष, अपक्षांच्या मतांना मोठे महत्त्व आले आहे.
पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी सांगितले की, राज्यातील सामाजिक सौहार्द आणि स्थैर्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांच्याशी संपर्क साधून या निवडणुकीत महाविकास आघाडीस आमच्या पक्षाचा पाठिंबा मागितला होता.
कपट कारस्थानानेही सत्तेवर येण्यास दारूण अपयश आल्याने नव्याने सत्तारूढ झालेले महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या नवनव्या संधी भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे केंद्र सरकार शोधत राहिले. एनआयएचा वापर करून भीमा कोरेगांवला झालेल्या हिंसाचाराशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या विचारवंत आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांना जवळजवळ चार वर्षे विनाखटला तुरूंगात डांबून ठेवले असल्याचा आरोप माकपने केला आहे. राज्यातील मुस्लिम-दलित जनतेविरुद्ध वातावरण भडकवण्यासाठी रास्व संघ/भाजप सतत कारस्थाने रचत आहे. राज्याला त्याच्या संविधानिक वित्तीय हक्कापासून वंचित ठेवत आपल्याला सत्ताभ्रष्ट केल्याबद्दल भाजप मराठी जनतेला शिक्षा करत असल्याचे पक्षाने म्हटले.
भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कॉर्पोरेट भांडवलदारांच्या संपत्तीत अमाप भर टाकली आहे. जनतेच्या मालकीची सर्व आर्थिक क्षेत्रे कवडीमोलाने हे सरकार त्यांना विकत आहे. हा सर्वात मोठा देशद्रोह असल्याचे माकपने म्हटले. महागाईने त्रस्त झालेल्या कामगार, शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी आणि महिलांच्या दुर्दशेस केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार आहे. शेतकरीविरोधात केंद्राने धोरण घेतली असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून कामगारांनी लढून मिळवलेले हक्क पायदळी तुडवणाऱ्या चार श्रमसंहिता मोदी सरकारने लादल्याचा आरोप माकपने केला आहे.
या सर्व कारणांसाठी भाजपला धडा शिकवण्यासाठी या राज्यसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिली.