Raj Thackeray & Uddhav Thackeray Rally: वरळी डोम अवघ्या काही मिनिटांत तुडुंब भरला, गेटवर अभूतपूर्व गर्दीचा महापूर; ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी धडपड
Raj Thackeray & Uddhav Thackeray Rally: डोम फुल्ल झाल्यानंतर गेटवरती सुद्धा अभूतपूर्व अशी गर्दी जमली होती. कोणत्याही परिस्थितीत आत जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड दिसून येत होती.

Raj Thackeray & Uddhav Thackeray Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोमच्या परिसरामध्ये अभूतपूर्व गर्दी झाली आहे. आज (5 जुलै) सकाळी साडेदहा वाजता वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्याला वेळ देण्यात आली होती. मात्र दोन तास आधीच वरळी डोम हाऊसफुल्ल झाला. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला महाराष्ट्रातून प्रचंड अशी मराठी सॅल्युट देण्यात आली आहे अशी चर्चा आहे. ठाकरे बंधूंच्या होणाऱ्या मेळाव्याकडे फक्त राज्याचे लक्ष नसून अवघ्या देशाचे लक्ष आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव यांच्यात मनोमिलन हे कायमस्वरूपी होणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
डोम फुल्ल झाल्यानंतर गेटवरती सुद्धा अभूतपूर्व अशी गर्दी जमली होती. कोणत्याही परिस्थितीत आत जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड दिसून येत होती. गर्दीला सावरण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना गेटवरती जावं लागलं. त्यावेळी मुंबईचे माजी महापौर सुद्धा या गर्दीमध्ये अडकले होते. इतकेच नव्हे तर मनसे नेते, शिवसेना नेत्यांना वरळी डोममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. इतकी अभूतपूर्व गर्दी गेटवर जमली होती. त्यामुळे गर्दीला नाराज न करता बाळा नांदगावकर यांनी पोलिसांशी चर्चा करून आत सोडण्याची विनंती केली. यानंतर गर्दी थेट डोमच्या दिशेने आत गेली. या गर्दीवरूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याचा अंदाज येऊ शकतो. गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले. दुसरीकडे, वरळी डोम परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
सामनामधूनही भावनिक साद
दरम्यान, आजच्या सामनामधूनही ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर भाष्य करण्यात आलं आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या भूमीवर, मुंबई नगरीत मराठी एकजुटीचा भव्य विजय सोहळा आज साजरा होत आहे. मराठी जीवनात सध्या विजयाचे आणि आनंदाचे क्षण तसे कमीच येतात. दिल्लीत सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आल्यापासून महाराष्ट्रावर चारही बाजूंनी प्रहार सुरूच आहेत. महाराष्ट्राची, मराठी जनांची नाकाबंदी करून त्यांना लाचार आणि शरणागत बनवण्याची एकही संधी सध्याचे भाजपाई दिल्लीश्वर सोडत नाहीत. अशा स्थितीत दिल्लीश्वरांनी लादलेले हिंदी सक्तीचे फर्मान उधळून मराठी माणसाने मराठी म्हणून विजयाचा एल्गार केला आहे. मराठी भाषेला शेपूट म्हणून हिंदी चिकटवण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या एकीने हाणून पाडला. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी एक झाले. त्या ऐक्यात तेजाने, शक्तीने, विचाराने उजळून दिसले ते अर्थात 'ठाकरे' भाऊ ! उद्धव आणि राज ठाकरे हे 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चात आपल्या फौजफाट्यासह एकत्र येत आहेत व त्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर अस्सल मराठी राडाच होईल या भयाने सरकारने महाराष्ट्रावर लादलेली हिंदी सक्ती रद्द करीत असल्याचे जाहीर केले. मराठी माणसे एकत्र आली की, काय चमत्कार घडतो त्याचे हे उत्तम उदाहरण. वरळीच्या भव्य सभागृहात यानिमित्ताने मराठी जनांचा विजयोत्सव साजरा होत आहे. खरे तर अशा मराठी विजयी मेळाव्यांना कोणतेही मोठे सभागृह पेलणार नाही. त्यासाठी मराठी माणसाचे हक्काचे शिवतीर्थच हवे होते.
इतर महत्वाच्या बातम्या























