लाडकी बहिण योजना, कर्जमाफी ते संतोष देशमुख हत्याप्रकरण, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे
गुढी पाडव्यानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. लाडकी बहिण योजना, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर भाष्य केलं.

Raj Thackeray : गुढी पाडव्यानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. लाडकी बहिण योजना, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्येसह औरंगजेबाची कबर या मुद्यांवर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केलं. तसेच कुंभमेळा, धर्म, राजकारण, प्रदुषण या मुद्यावरुन देखील राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर टीका केली. पाहुयात राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे.
लाडकी बहिण योजना बंद होणार
राज्य सरकारच्या महत्वकांक्षी लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकारवर या योजनेमुळं 63000 कोटींचं कर्ज होईल असे राज ठाकरे म्हणाले. ही योजना बंद होणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. कर्ज काढून दिवाळी करायली सांगितली कोणी? असे राज ठाकरे म्हणाले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले राज ठाकरे?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केले. त्यांची खूप घाणेरड्या पद्धतीनं हत्या केली आहे. तुमच्या नसा नसात एवढी क्रूरता भरली असेल तर मी जागा दाखवेन तिथे जा असेही राज ठाकरे म्हणाले. हे सगळं झालं कशातून? तिथे असणाऱ्या मिल, प्रकलापातून निघणारी राख, मी आजपासून एकलं होत राखेतून फिनिक्स पक्षी भरारी घेतो. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात असे राज ठाकरे म्हणाले. विषय होता पैशाचा. संतोष देशमुख यांनी कंडण्यांना विरोध केला म्हणून हे झाल्याचे राज ठाकरे म्हणाले.
कर्जमाफीच्या मुद्यावर काय म्हणाले राज ठाकरे
निवडणुकीच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं कर्जमाफी होणार. पण काल अजित पवार म्हणाले की 30 तारखेच्या आधी पैसे भरुन टाका. कर्जमाफी होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वाटेल ते बोलणार आणि निवडणुका झाल्या की म्हणतात पैसे भरा असे राज ठाकरे म्हणाले. दिवसाला शेतकऱ्यांचा 7आत्महत्या होत आहेत. त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. असंख्य मुलं मुली पुण्याकडे येत आहेत. आम्ही त्यांना जातीत अडकवलं आहे असे राज ठाकरे म्हणाले. रोजगार निर्माण होत नाही, त्याकडे लक्ष दिलं जात नाही.
राज्याच्या राजकारण सर्वात जास्त आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते
आजपर्यंत राज्याच्या राजकारण सर्वात जास्त आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? मग काय केलं आमदारांनी. मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मागावे लागत असेल तर एवढे आमदार मंत्री मुख्यमंत्री का निवडून दिले एसे राज ठाकरे म्हणाले. हे फक्त निवडणुकीसाठी मते घेण्यासाठी जातीचा वापर केला जातो असे राज ठाकरे म्हणाले.
जातीपातीचे भेद गाडून मराठी म्हणून एक राहिलं पाहिजे
निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन दिली ती तुम्ही विचारलं पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले. जातीपातीचे भेद गाडून मराठी एक म्हणून तुम्ही उभे राहिले पाहीजेत असे राज ठाकरे म्हणाले.
औरंगजेब कबरीजवळ मोठा बोर्ड लावा
औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिलसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांनी संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथं गाडला गेला. हा आमचा इतिहास असे राज ठाकरे म्हणाले. आम्ही कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या, असे राज ठाकरे म्हणाले. तिकडे लहान लहान मुलांच्या ट्रीप गेल्या पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.
धर्माच्या नावाखाली नद्या बरबाद
नदी प्रदुषणाच्या मुद्यावर राज ठाकरेंनी भाष्य केलं. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सर्वांना आपापला धर्म प्रिय असतो, पण यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत असे राज ठाकरे म्हणाले. धर्माच्या गोष्टी मला सांगू नये कोणी असेही ठाकरे म्हणाले. मुंबईत पाच नद्या होत्या त्यातील चार नद्या मारल्या गेल्या आहेत. सांडपणी झोपडपट्यांमधून मारल्या गेल्या. आता मिठी नदी उरली आहे असे राज ठाकरे म्हणाले.
विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत, जंगलतो़ड थांबली पाहिजे
सगळीकडे झाडं जगवा झाडे लावा असे बोर्ड लावले जातात. मात्र, दुसरीकडे हिंदुचे अंत्यसंस्कार लाकडावर होतात. जंगलतो़ड झाल्याशिवाय लाकूड येणार नाही. याला पर्याय म्हणून विद्युतदाहिन्या आल्या आहेत. देशभर विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगलात गेले होते परदेशी माणसांबरोबर. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. त्यांना प्राण्यांचीही आवड आहे. जंगले जगवली पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईत आहे ते जगात कुठेही नाही. पण सध्या सगळीकडे जंगलतोड सुरु आहे असे राज ठाकरे म्हणाले.
प्रश्न पाण्याच्या स्थितीचा, कुंभमेळ्याचा अपमान नाही
देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. ज्याला आपण माता म्हणतो देवी म्हणतो त्या नद्यांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे असे राज ठाकरे म्हणाले. गंगा साफ करा असे प्रथम राजीव गांधी म्हणाले होते. तेव्हापासून गंगा साफ होत होते. पंतप्रधान मोदींनी 2014 साली तेच सांगितलं आहे. नद्यांची अवस्था बिकट आहे. कुंभमेळ्यात लाखो लोक अंघोळ केल्यानंतर आजारी पडले आहेत. प्रश्न पाण्याच्या स्थितीचा आहे. कुंभमेळ्याचा अपमान नाही असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी गंगेची स्थिती दाखवणार व्हिडीओ दाखवला. नैसर्गिक गोष्टीवर असा धर्म आडवा येत असेल तर काय करायंच त्या धर्माचं असा सवाल ठाकरेंनी केला.
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. विकी कौशल मेल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान समजले काय? असा सवाल करत राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. सध्या माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. इतिहासाच्या मुळाला गेला ना तुमच्या अपेक्षांची भांडी फुटतील असे राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हा एक चमत्कार आहे. हा एक विचार आहे असे राज ठाकरे म्हणाले.


















