(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rain in Jalgaon : जळगावात दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस; तोक्ते चक्रीवादळाप्रमाणे मदतीसाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री गुलाबराव पाटलांची माहिती
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील तापी नदीकाठच्या गावांमध्ये वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल आणि तारांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
जळगाव : जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावातील घरांचंही या पावसात नुकसान झालं असून वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा केळी पिकाला बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केली असून तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणाला ज्या पद्धतीने मदत मिळाली तशी मदत जळगाव जिल्ह्यासाठी मिळण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील तापी नदीकाठच्या गावांमध्ये वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल आणि तारांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे उचंदा, मेंढोदे, नायगाव तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम, विटवा, निंबोल, ऐनपूर, वाघाडी, धामोडी, सुलवाडी आणि इतर ठीकाणी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल. तसेच कोकणात ज्या पद्धतीने मदत देण्यात आली तशीच मदत जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोदे गावातील 180 घरांचे नुकसान झाल्याने या ठिकाणी देखील पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी करून गावकऱ्यांना मोफत अन्नधान्य तत्काळ देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :