(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Children Drowned in Solapur : दक्षिण सोलापुरात भीमेच्या पात्रात चार मुलं बुडाली, स्थानिकांच्या मदतीने पोलिसांचे शोधकार्य सुरु
दक्षिण सोलापुरातील लवंगी गावात चार लहान मुले नदी पात्रात (Children Drowned in Solapur ) वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. दुपारपासून स्थानिक मच्छिमार, जीवरक्षक यांच्या मदतीने पोलिस या बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत.
सोलापूर : दक्षिण सोलापुरातील लवंगी गावात चार लहान मुले नदी पात्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. दुपारपासून स्थानिक मच्छिमार, जीवरक्षक यांच्या मदतीने पोलिस या बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत. मात्र पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. (Four children drowned in Bhima River in South Solapur, police started search operation with locals )
आज दुपारी 3.30 च्या सुमारास गावातील शिवाजी रामलिंग तानवडे हे भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. थोड्या वेळाने त्यांच्या दोन्ही मुली समीक्षा तानवडे आणि अर्पिता तानवडे तसेच त्यांच्या मेहुण्याची मुलगी आरती पारशेट्टी आणि मुलगा विठ्ठल पारशेट्टी असे चौघे देखील पोहण्यासाठी आले होते. मात्र शिवाजी यांनी त्यांना नदीपात्राजवळून हकलून लावत घराकडे परत पाठवले होते. मात्र शिवाजी पोहोत नदीपात्रात आतपर्यंत गेल्यानंतर चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समीक्षा तानवडे तसेच अर्पिता तानवडे या दोघींना पोहता येत होते. मात्र आरती आणि विठ्ठल पारशेट्टी या दोघांना मात्र पोहता येत नव्हते. नदी पात्राचा अंदाज न आल्याने आऱती आणि विठ्ठल दोघेही बुडू लागले. तेव्हा समीक्षा आणि अर्पिता या दोन्ही बहिणींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुळे चौघे देखील पाण्यात बुडू लागले. मुले बुडत असल्याचा आवाज शिवाजी यांना आल्यानंतर त्यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चारही मुले त्यांच्या हातातून निसटली. वडीलांसमोर आपली मुलं वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे शिवाजी यांनी चौघे बुडताना त्यातील दोघांना किनाऱ्याच्या जवळ आणून सोडलं होतं. पण पूर्ण किनाऱ्यावर न आणता गडबडीत दुसऱ्या दोघांना वाचवायला ते गेले. तिथे जाईपर्यंत ते दोघे गेले, परत येईपर्यंत किनाऱ्याच्या जवळचे दोघेही वाहून गेले.
या घटनेत समीक्षा शिवाजी तानवडे वय 13, अर्पिता शिवाजी तानवडे वय 12, आरती शिवानंद पारशेट्टी वय 12, विठ्ठल शिवानंद पारशेट्टी वय 10 अशी चौघे मुले वाहून गेली आहेत. घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोहता येणारे स्थानिक तरुण, मच्छिमार, जीवरक्षक यांच्या साह्याने मुलांचा शोध घेतला जातोय. अद्याप चौघांपैकी कोणीही सापडलेले नाहीत. पावसामुळे शोध कार्य़ात काहीसा अडथळा येत असल्याची माहिती मंद्रुप पोलिसांनी दिली.
काल भीमा नदीत वाहून गेलेल्या पंढरपुरातील दोघांचा मृत्यू
काल पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील दोघे देखील भीमेच्या पात्रात वाहून गेले होते. वाहून गेलेल्या या मामी-भाच्याचे मृतदेह आज हाती लागल्याने दु:ख व्यक्त केले जात आहे. या घटनेत जय दत्ता जाधव (वय 12) आणि त्याची मामी पायल सुग्रीव लोंढे (वय 18) या दोघांचा मृत्यू झाला आहे. जय हा तीनच दिवसांपूर्वी आपल्या मामाकडे राहण्यासाठी आला होता. मामी पायल ही गावातील काही महिलांसोबत कपडे धुण्यासाठी नदीकडे जात असताना जय देखील सोबत गेला होता. कपडे धुताना जय नदी पात्रात उतरला मात्र तो पाण्यात बुडू लागला. हे पाहून त्याची मामी पायल आणि इतर महिला त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या. ही परिस्थिती पाहून जय याचे मामा सुग्रीव लोंढे यांनी देखील पाण्यात उडी घेतली. एका महिलेला वाचवण्यात त्यांना यश आलं. मात्र जय आणि पायल मात्र खोल पाण्याच बुडाल्या होत्या. कालपासून या दोघांचा शोध प्रशासनामार्फत घेतला जात होता. मात्र आज या दोघा मामी-भाच्याचा थेट मृतदेहच हाती लागल्याने कुटुंबियांसह ग्रामस्थांनी हंबरडा फोडला.