Rahul Narvekar : मी कुणाला खूश करायला निकाल दिला नाहीये, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सर्वांना मुभा, ठाकरे गटाच्या याचिकेनंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया
Rahul Narvekar : ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. त्यानंतर राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये.
मुंबई : मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाही, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशांनुसारच निकाल दिला. भारतातील कोणत्याही नागरिकाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलीये. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलीये. त्यावर आता राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया समोर आलीये.
याचिका गेली म्हणजे निकाल चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही, निकालात काय चुकीचं आहे हे न्यायालयाने दाखवून द्यावं लागेल, असं देखील राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील आपला निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचं सांगत ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवलं नाही.
घटना बदलल्याचं त्यात काही उल्लेख नव्हता - राहुल नार्वेकर
अनिल परब यांनी 2018 साली बदलेल्या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे पुरावे माझा कट्टावर सादर केलेत. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकरांनी म्हटलं की, माझ्याकडे ते पत्र देण्यात आलेलं आहे. 4 एप्रिल 2018 च्या पत्रात केवळ पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल आयोगाला कळवण्यात आले होता. घटना बदलली त्याबाबत त्या पत्रात काहीही नव्हतं. निकालातील सर्वप्रथम 2018 मध्ये जी घटना दुरुस्ती केली ती ग्राह्य धरायची की 1999 ची ग्राह्य धरायची हा मुद्दा आहे.
राष्ट्रवादीच्या निकालवरही प्रतिक्रिया
31 जानेवारीपर्यंत हा निकाल द्यायचा आहे. लवकरात लवकर निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल. उद्याच्या सुनावणी बाबत विधिमंडळ सचिवालय कळवेन, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर दिली. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे या आठवड्यात सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली.दरम्यान या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. तसेच शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान 20 ते 25 जानेवारी दरम्यान फेरसाक्ष नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.