रस्त्याचं काम केलं म्हणजे विकास नाही, रोहित पवारांचा राम शिंदे यांना टोला
कर्जत-जामखेड मतदारसंघात आता बाहेरचं आणि आतलं पार्सल, असा काही विषय राहिलेला नाही.जनतेची कामं करणारा, त्यांचे प्रश्न मांडणारा आमदार त्यांना पाहिजे आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
अहमदनगर : कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे आणि भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. भाजप नेते हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र शरद पवारांचे काम मोठे आहे, त्यांच्या विरोधात बोलले तर भाजप नेत्यांना महत्व मिळेल म्हणूनच ते शरद पवारांवर टीका करतात, असं रोहित पवारांनी म्हटलं.
शरद पवार ही व्यक्ती नसून एक विचार आहे. त्यामुळे जनतेचा कौल देखील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने असेल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने जागावाटप जाहीर केले, मात्र कोणती जागा कोणाला हे अद्यापही जाहीर केले नाही. जागावाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल. त्यामुळे उशीर होऊ नये म्हणून आम्ही ठिकठिकाणी प्रचार सुरू केला आहे, असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं.
जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागू नये. वाट पाहत बसलो तर त्याचा फायदा भाजपला होऊ नये, असंही रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना देखील टीकेचे लक्ष्य केलं.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कर्जत-जामखेडमध्ये आता बाहेरचं आणि आतलं पार्सल, असा काही विषय राहिलेला नाही. जनतेची कामं करणारा, त्यांचे प्रश्न मांडणारा आमदार त्यांना पाहिजे आहे. मतदारसंघात महिलांना रोजगार, पाण्याची समस्या गंभीर असताना केवळ रस्त्याचं काम केले म्हणजे विकास झाला असं राम शिंदे यांना वाटत असल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला.