Pune Weather Update : पुण्यात हुडहुडी! हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद, पुढील काही दिवस तापमानात घट होण्याची शक्यता
Pune Weather Update : पुणेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहे. दिवसभर पुण्यात ऊन सावल्याचा खेळ सुरु असल्याचं दिसत आहे. पुणे आणि आसपासच्या चार भागात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे : पुण्यात सध्या तापमानात घट झाली आहे. त्यामुळे (Pune Weather Update) पुणेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहे. दिवसभर पुण्यात ऊन सावल्याचा खेळ सुरु असल्याचं दिसत आहे. पुणे आणि आसपासच्या चार भागात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश निरभ्र आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या उत्तर भागातही तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
हंगामातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद
जिल्हात किमान तापमानात घसरण होत असल्याने शहर आणि परिसरातील किमान चार भागात 16 जानेवारी रोजी 9 अंश सेल्सिअसच्या जवळपास एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. पाषाण येथे 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एनडीए 9.3 अंश सेल्सिअस, शिरूर 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी पाषाण येथे 9.7 अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी शिवाजीनगर येथे 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान होते. पुणे जिल्ह्यात या आठवड्यात आकाश निरभ्र असल्याने या कालावधीत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, अशी माहिती पुणे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.
पिंपरीत धुक्यांची चादर
पिंपरी चिंचवडमध्ये आज चहुबाजूंनी धुक्याची चादर पसरली होती. या धुक्यात इमारती अक्षरशः हरवून गेल्या. ढग जमिनीवर अवरतल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जणू जम्मू काश्मीरचा निसर्ग शहरात अवतरला होता. शहरवासीयांना यंदाच्या मोसमात गुलाबी थंडीची चाहूल पहिल्यांदाच अनुभवता आली. ग्रामीण भागात ही धुक्यामुळं कमालीची थंडी पसरलेली आहे.
तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता
दरम्यान, देशाच्या उत्तर भागात असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यावर, विशेषत: उत्तर भागावर होऊ लागला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय घट झाली आहे. येत्या काही दिवसांत राज्याच्या उत्तर भागात तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घसरण होणार असून तापमान 7 ते 8अंश सेल्सिअसराहील, असा अंदाज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
इतर महत्वाची बातमी-