Roof top hotel pune : पुण्यातील Roof top हॉटेल्स बनतायत डोक्याला ताप; 21 Roof top हॉटेल्सवर थेट कारवाई
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील रूफटॉप हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अधिकार्यांनी गेल्या पाच महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणार्या 21 रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई केली आहे.
पुणे : पुण्यात सध्या रुफ टॉप हॉटेल्सची चांगलीच (Roof top hotel) क्रेझ आहे. मात्र हेच रुफ टॉप हॉटेल अनेक पुणेकरांच्या डोक्याला ताप झाल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. अनेक हॉटेल्स अनधिकृत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना या हॉटेल्सचा त्रास होतो. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील रूफटॉप हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अधिकार्यांनी गेल्या पाच महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणार्या 21 रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी या हॉटेल्सच्या मालकांकडून 6 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेत हॉटेल्सना जास्त दंड आकारला आहे. एका वर्षात एकूण 29 रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. शहर पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही पुण्यातील रुफटॉप हॉटेल्सविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत शहरातील अनेक रूफटॉप हॉटेलचे बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. महंमदवाडी, कल्याणीनगर, येरवडा, कोरेगाव पार्क, बाणेर, पाषाण, कोथरूड, खराडी आणि शहरातील इतर भागात असलेल्या प्रसिद्ध रूफटॉप पब आणि बारला यापूर्वी नोटीसा बजावल्या होत्या आणि त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आली होती.
तरुणांचा आवाज आणि राडा
पुण्यातील अनेक परिसरात रुफ टॉप हॉटेल्स आणि बार आहेत. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. अनेक तरुण मंडळीचं सध्या आवडीचं ठिकाण म्हणजे अनेक रुफ टॉप हॉटेल्स आणि बार झाले आहेत. तरुणांचा आवाज आणि राडा रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने गाण्याच्या आवाजाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारी दिल्या होत्या. यावेळी पोलिसांवर देखील नागरीक मंचाने आरोप केले होते.
तरुणांचं आवडतं ठिकाण बनतंय धोक्याचं
सध्या रुफटॉप हॉटेल्स महापालिकेच्या रडारवर आहे. त्यातील फक्त काहीच हॉटेल्सकडे योग्य ते परवाने असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात शेकडोच्या संख्येने रुफ टॉप हॉटेल्स आहेत. त्यातील काहीच ह़ॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. बाकी हॉटेल्स सर्रास सुरु असल्याचं चित्र आहे. मात्र त्या हॉटेल्सवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधलेल्या लुल्ला नगर परिसरातील हॉटेलला आग लागली होती. त्यावेळी अनेक ग्राहकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता होती.