Ganeshostav 2024 : पुणे पोलिसांची शहरातील अनेक गणेश मंडळांवर कारवाईचा बडगा; तब्बल 31 गुन्ह्यांची नोंद
Ganeshostav 2024 : गणेशत्सवसंदर्भात पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात पुणे पोलिसांनी अनेक मंडळांवर कारवाईचा बडगा उगारल्याचे चित्र आहे.
Ganesh Festival पुणे : राज्यात गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. घरघुती गणरायांपासून ते अगदी अनेक गणेश मंडळांतील लाडक्या बाप्पाला नागरिकांनी मोठ्या उत्साहात निरोप दिला आहे. तर दुसरीकडे आता आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी पुन्हा एक वर्षांची वाट पहावी लागणार आहे. असे असताना गणेशत्सवसंदर्भात पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshostav 2024) दहा दिवसांच्या काळात पुणे पोलिसांनी अनेक मंडळांवर कारवाईचा बडगा उगारल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी शहरातील अनेक गणेश मंडळांवर कारवाई करत तब्बल 31 गणेश मंडळांवर गुन्हे नोंदवले आहे. यात ध्वनीप्रदूषण प्रकरणात पुणे पोलिसांकडून 11 मंडळांवर गुन्हे दाखल केले आहे. तर छेडछाड, किरकोळ वाद, विसर्जना दिवशी झालेले वाद अशा 19 गुन्ह्यांची देखील पुणे पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे.
ध्वनीप्रदूषणाबाबत आतापर्यंत 11 गुन्हे
गणेशोत्सव काळात कर्णकर्कश आवाजात डीजे लावण्यास, तसेच लेझर लाईट लावण्यास सक्त मनाई केली होती. याबाबत सूचनाही वेळोवेळी दिलेल्या होत्या. यानंतरही उपनगरासह मुख्य मिरवणूकीत डीजेचे थर लाऊन मोठा आवाज वाढवत डीजेचा दणदणाट केला गेला. परिणामी पुणे पोलिसांकडून तयार करण्यात आलेल्या विविध पथकांकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आतापर्यंत 11 गुन्हे ध्वनीप्रदूषणाबाबत नोंदवले गेले आहेत. यात आणखी कारवाई सुरू असून, स्थानिक पातळीवर काम सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती-
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळानं हा निर्णय घेण्यात आला.
लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान-
गणेशभक्तांनी लालबागच्या राजाला यंदाच्या वर्षीदेखील भरभरुन दान केल. लालबागच्या राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रुपयाचे रोख रकमेचे दान भाविकांनी केलं आहे. तर, 4151.360 ग्रॅम सोनं लालबागच्या राजा चरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आलं आहे. तर 64321 ग्राम चांदी लालबागच्या राजाच्या चरणी दान म्हणून अर्पण करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.