'लाडकी बहीण योजने'साठी आत्तापर्यंत किती अर्ज आले?, मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले, विरोधकांनाही सुनावले
अदिती तटकरे यांनी विरोधकांना सांगितले, एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला कॅम्प आयोजित करायचे. आणि वेगळे बॅनर लावून दिशाभूल करायची. अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.
Pune News राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत(Ladki Bahin Yojna) विरोधकांकडून टीका केली जात असताना या टीकेला महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी बारामतीतून उत्तर दिलंय. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ७२ लाखांपेक्षा जास्त अर्ज करण्यात असल्याचे सांगत या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी, सर्वर डाऊनची अडचण, महिलांकडून फॉर्म भरून घेताना घेतले जाणारे पैसे, यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेला मंत्री अदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki bahin yojana) महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने महिलांकडून फॉर्म भरुन घेतले जात आहेत. यात नारीशक्ती दूत ॲपवरुन, पोर्टलवरुन, सेतू कार्यालय, अंगणवाडी सेविका आणि महिला व बाल कल्याण विभागातही महिलांकडून या योजनेसाठी अर्जांची पूर्तता केली जात आहे. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला उत्तर देत त्यांनी विरोधकांना चांगलच सुनावलंय.
लाडकी बहीण योजनेसाठी रोज ८ ते १० लाख अर्ज
लाडकी बहीण योजनेसाठी रोज ८ ते १० लाख अर्ज येत असून आत्तापर्यंत ७२ लाखांपेक्षा जास्त अर्जांची नोंदणी झाली आहे, असे सांगत अदिती तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, विरोधक पहिला दिवसांपासूनच या योजनेसंदर्भात टीका करत आहेत. मात्र मला आवर्जून सांगायचे आहे की, या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासाठी ही गोष्ट समाधानकारक आहे. जे टीका करत आहेत.ते त्यांच्या मतदार संघात त्यांचे बॅनर लावून कॅम्प आयोजित करत आहेत. त्यामुळे महायुती सरकारने आणलेली ही योजना माता भगिनींसाठी किती उपयुक्त आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती आहे. त्यामुळे एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला कॅम्प आयोजित करायचे. आणि वेगळे बॅनर लावून दिशाभूल करायची. अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.
मनोज जरांगेंनी केली लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीका
"लाडकी बहिण योजना आताच आणायची होती का? त्याच्यामुळे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये. आमची खूप परवड लागली आहे, आम्हाला टाईम पण मिळत नाही, दहा दिवसात कसं सर्टिफिकेट मिळायचं, पावतीवर रजिस्ट्रेशन करायला सांगत आहेत, आम्हाला पावती पण भेटत नाही", असं म्हणत मराठा विद्यार्थीनीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांच्यासमोर टाहो फोडला.
1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का?
तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, धनगरांना आरक्षण द्यायचं नाही. नवीन काहीतरी योजना आणतात, लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी-लाडका मेहुणा योजना आणतील, अशी टीका त्यांनी सरकारच्या योजनेवर केली आहे. या योजनेमुळे तिथे गर्दी झाल्यामुळे साईट बंद पडले आहेत. एवढा लोड त्या ठिकाणी आलेला आहे. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तिथे झालेल्या गर्दीमुळे ऍडमिशनला मुलांचा गोंधळ उडत आहे. सर्व जातींना अशा योजना जाहीर करून तुम्ही आरक्षणापासून वेगळं करू शकत नाहीत. तुम्ही 1500 रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत. 1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
हेही वाचा:
वेळ कमी, लाभार्थी जास्त; 'लाडकी बहीण योजने'च्या अंमलबजावणीसाठी सरकारची अशी 'आयडिया'