(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange Patil : 1500 रुपये आम्हाला आयुष्याला पुरणार का? लाडकी बहिण योजनेवरून मनोज जरांगेंची सरकारवर जोरदार टीका
Manoj Jarange Patil : आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Manoj Jarange Patil जालना : नवीन काहीतरी योजना आणतात, लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी-लाडका मेहुणा योजना आणतील. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तुम्ही 1500 रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत. 1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का? अशी जोरदार टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लाडकी बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारवर केली आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे. समाजासाठी मी आमरण उपोषण करत आहे. समाजाचे फक्त मी एवढंच ऐकत नाही. समाज मला आमरण उपोषण करू नका, असे म्हणत होता. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. आरक्षण द्यायचे असेल तर बहाण्याची सरकारला गरज नाही. मराठा समाजाच्या मुलांना नोकरभरती, ऍडमिशनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Ews सुरू ठेवावे. Ecbc आणि कुणबी हे तीनही प्रमाणपत्र सुरू ठेवावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
तुम्ही व्हॅलिडिटीची अट कशाला ठेवली?
Ecbc दिल्यानंतर सरकारने ews बंद केले आहे, ते सुरू ठेवा. सरकारने मुलींना मोफत शिक्षण केले आहे. मात्र मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही. तुम्ही व्हॅलिडिटी अट कशाला ठेवली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. चंद्रकांत दादा नुसतेच म्हणत आहे, मुलींना मोफत शिक्षण देत आहोत. मात्र ते दिले गेले नाही. मुलींना मोफत शिक्षण द्यायचे असेल तर त्यात भेदभाव करू नका, असे त्यांनी म्हटले.
मराठा आणि कुणबी एकच
आम्हाला सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता तेवढा वेळ आम्ही दिला आहे. आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाबाबत आम्ही ठाम आहोत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा. कुणाच्या हरकती असतील तर आम्हाला त्याच्याशी देणे घेणे नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. 2004 चा कायदा सुशीलकुमार शिंदे सरकारने बनवला आहे. तुम्ही त्या कायद्यात दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी मला हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
काही पोलीस अधिकाऱ्यांकडून जातीयवाद
ते पुढे म्हणाले की, मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल. कोणीही अंतरवलीकडे येऊ नका, इकडे पाऊस आहे, कामाचे दिवस आहेत. लाडसाहेब म्हटले होते की, एसपीचा विषय नाही सीपीचा म्हणतात, आम्ही खेड्यापाड्यातील बोलताना, अस म्हणत असतो. काही पोलीस अधिकाऱ्यांकडून जातीयवाद सुरू आहे. बोगस पुस्तक गोळा करून ते आयएएस बनतात.
1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का?
तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, धनगरांना आरक्षण द्यायचं नाही. नवीन काहीतरी योजना आणतात, लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी-लाडका मेहुणा योजना आणतील, अशी टीका त्यांनी सरकारच्या योजनेवर केली आहे. या योजनेमुळे तिथे गर्दी झाल्यामुळे साईट बंद पडले आहेत. एवढा लोड त्या ठिकाणी आलेला आहे. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तिथे झालेल्या गर्दीमुळे ऍडमिशनला मुलांचा गोंधळ उडत आहे. सर्व जातींना अशा योजना जाहीर करून तुम्ही आरक्षणापासून वेगळं करू शकत नाहीत. तुम्ही 1500 रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत. 1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.