Pune news : पुणे तिथे काय उणे! हेल्मेट घालणाऱ्याला पाव किलो टॉमॅटो अन् नसणाऱ्याला वांगं; ड्रायव्हिंग स्कूलची मोहीम नेमकी काय?
पुण्यातील एका ड्रायव्हिंग स्कुलने हेल्मेट जनजागृतीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. हेल्मेट घालून असलेल्या प्रवाशाला पाव किलो टोमॅटो तर हेल्मेट घालून नसणाऱ्यांना एक वांगं बक्षिस म्हणून दिलं आहे.
Pune News : सध्या सगळीकडे अपघाताचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हेल्मेट घालणं प्रचंड महत्वाचं आहे. हेल्मेटने सुरक्षित प्रवास करता येतो. त्यामुळेच पुण्यातील एका ड्रायव्हिंग स्कुलने हेल्मेट जनजागृतीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. हेल्मेट घालून (Tomato) असलेल्या प्रवाशाला सध्या सोन्याचे भाव असलेले पाव किलो टोमॅटो बक्षिस दिले आहे तर हेल्मेट घालून नसणाऱ्यांना एक वांगं बक्षिस म्हणून दिलं आहे.
सध्या सगळीकडे टोमॅटोच्या भावाची चर्चा आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या टोमॅटोमुळे लखपती झाले आहेत तर अनेक शेतकऱ्यांचं मे महिन्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे टोमॅटो किंवा कोणतीही भाजी कितीही महाग झाली तरीही शेतकरी आम्ही तुमच्या सगळे सोबत आहोत. फक्त तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या, असा संदेश देत त्यांनी हा उपक्रम राबवला आहे.
पुण्यातील मुळीक ड्रायव्हिंग स्कूल यांच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील विश्रांतवाडी चौकात अनेक प्रवाशांना सिग्नलवर थांबवून टोमॅटो देण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
पेसे,वेळ नाही जीव महत्वाचा...
रोज अनेक अपघात घडतात. त्यात अनेकांचा जीवही जातो. हलगर्जीपणा अनेकदा अंगावर येतो. परिणामी हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर इजा होण्याची भीती असते. त्यामुळे प्रत्येकाने हेल्मेट घालूनच गाडी चालवावी. पैसे आणि वेळ ही महत्वाची असतेच मात्र त्याहून महत्वाचा आपला जीव असतो. त्यामुळेच गाडी चालवताना हेल्मेट घालण्याचं आवाहन या ड्रायव्हिंग स्कूलकडून करण्यात आलं आहे.
टोमॅटो आणि वांगं बक्षीस...
बाजारात टोमॅटोला सध्या सोन्याचा भाव आहे. त्यामुळेच हेल्मेट घालून दिसणाऱ्याला सोन्याचा भाव असलेले टोमॅटो बक्षिस म्हणून दिले. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा उपक्रम चकीत करणारा होता. अनेकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला तर हेल्मेट न घालणाऱ्यांनी हेल्मेट घालण्याचं वचन दिलं आहे.
पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढत आहे. त्यातच पुण्यातील वाहतूक कोंडींचा प्रश्न आहेच. अनेकदा घाई करत तरुण भरधाव वेगात गाडी चालवतात. त्यामुळे अपघात होतो आणि जीव गमवावा लागतो. त्यामुळे तुमचे हक्काचे व्यक्ती घरात तुमची वाट पाहत आहेत. तुमच्या जाण्याने घरावर मोठं संकट येऊ शकतं. त्यामुळेच हळू गाडी चालवा आणि हेल्मेट घाला असा संदेश या ड्रायव्हिंग स्कूलने दिला आहे.