Pune Chandani Chowk : अखेर पुणेकरांची वाहतुक कोंडीपासून सुटका होणार; बहुप्रतिक्षित चांदणी चौकातील प्रकल्पाचं आज उद्घाटन
Pune News : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे.
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. यानिमित्त पुणे दौऱ्यात गडकरी महत्त्वपूर्ण बैठकही घेणार आहेत. आज सकाळी 10 वाजता चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे नितीन गडकरी उद्घाटन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहे.
कसा आहे चांदणी चौकातील पुल?
उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल 397 कोटी रुपयांचा आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
उद्घाटनापूर्वीच भाजपमध्ये नाराजीनाट्य
या उद्घाटनाची पुणेकर आतुरतेने वाट पाहत होते. मात्र याच पुलावरुन भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी या उद्घाटनात डावलल्याचा आरोप केला आहे. मागील अनेक वर्षांपासून त्या पुण्यात भाजपचं काम करत आहेत. पुण्यातील कोथरुड भागातील विकासात कुलकर्णीचा मोठा वाटा आहे. या पुलासाठीपण त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावललं गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोथरुडमधील सध्याचे नेते माझं अस्तित्व मिटवण्याचं काम करत असल्य़ाचं त्यांनी म्हटलंय. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं पोस्टर ट्विट करत त्यांनी हा आरोप केला आहे.
1 ऑक्टोबरला स्फोट करुन जुना पुल पाडला होता...
चांदणी चौकातील पुलाचं काम सुरु होऊन अनेक महिने झाले आहेत. चांदणी चोकातील वाहतुकीला अडथळा निर्माम होणारा पुल 1 ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतरही अनेकदा वाहतुक कोंडी जैसे थेच होती. पुणे-बंगळुरु महामार्गावर या पुलामुळे वाहतुक कोंडी प्रचंड प्रमाणात व्हायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या वाहतुक कोंडीत सापडले होते. त्यानंतर त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली आणि त्यांनी चांदणी चौकातील पुल पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 1 ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता.
इतर महत्वाची बातमी-