Pune ACB Raid : दर महिन्याला पगार पण...! 25 हजारांची लाच घेताना पुणे महानगरपालिकेचा मीटर रीडरला रंगेहात अटक
25 हजार रुपयांची लाच घेणार्या मनपाच्या मीटर रीडरला पुण्याच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत पत्र देण्यासाठी या लालेची मागणी करण्यात आली होती.
Pune ACB Raid : लाचलुचपत विभागाच्या रडारवर आता पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आहेत. 25 हजार रुपयांची लाच घेणार्या मनपाच्या मीटर रीडरला पुण्याच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पाणी पुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) ना हरकत पत्र देण्यासाठी या लालेची मागणी करण्यात आली होती. उमेश राजाराम कवठेकर असे या 54 वर्षीय मीटर रीडरचे नाव आहे. ते चतु:श्रृंगी पाणी पुरवठा विभागात नोकरीला आहे.
या प्रकरणी परवानाधारक प्लंबरने तक्रार दिली आहे. तक्रारदार लायझनिंगचं काम करतात. त्यांना बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर (Shivaji Nagar) येथील मिळकतीला पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत पत्र हवे होते. त्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. याच पत्रासाठी पाठपुरावा करण्यासाठी कर्वे रोडवरील पाणी पुरवठा विभागात गेले होते. त्यावेळी ना हरकत पत्रासाठी उमेश कवठेकर याने 25 हजार रुपयांची लाच मागितली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
हा प्रकार पाहून परवानाधारक प्लंबरने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उमेश कवठेकर याने दोन वरिष्ठ अधिकार्यांसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये आणि स्वत:साठी 5 हजार रुपये अशी एकूण 25 हजार रुपयांची मागणी केली. हा सगळा प्रकार पाहून लाच लुचपत विभागाने मंगळवारी कर्वे रोडवरील पाणी पुरवठा विभागात सापळा रचला आणि तक्रारदाराकडून 25 हजार रुपये स्वीकारताना कवठेकर याला पकडण्यात आले.
अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार पण....
यापूर्वी येरवडा येथील जीएसटी कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत महिलेला रंगेहात पडकले होते. या महिला कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडले होते. बॅंक खाते उघडण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी ही महिला लाचेची मागणी करत होती. 46 वर्षीय एका व्यक्तीने या लाचे प्रकरणी तक्रार दिली होती त्यानंतर त्या महिलेला पकडण्यात आलं. पुणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. गुरुवारी (2 जून) दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात होती. ज्योत्स्ना रामचंद्र कोरडे असं 35 वर्षीय भ्रष्ट महिला अधिकाऱ्याचं नाव होतं. या महिलेने बॅंक खाते उघडण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी एका 46 वर्षीय व्यक्तीकडे दोन हजार रुपयांनी मागणी केली होती. आरोपी ज्योत्स्ना कोरडे ही वस्तू व सेवा कर कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी तक्रारदाराचे सील केलेले बँक खाते पुन्हा उघडण्यासाठी आणि पैसे काढण्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी 2,000 रुपयांची मागणी केली होती. मात्र,लाचेची रक्कम स्वीकारली जात नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या: