पावसामुळं भात शेती जमीनदोस्त, मराठवाड्याप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत द्या, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना केलेल्या मदतीप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना मदत करा, असी मागणी भास्कर जाधव यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Bhaskar Jaghav : सप्टेंबर महिन्यात राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली आहे. तसेच अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली होती. यामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती. तर काही ठिकाणी पुरामुळं पिकासकट जमिनी देखील वाहून गेल्या होत्या. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला होता. याचबरोबर कोकणात देखील शेती पिकांचं नुकसान झालं होतं. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहलं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना केलेल्या मदतीप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना मदत करा, असी मागणी भास्कर जाधव यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
पावसामुळं कोकणातील भात शेती जमीनदोस्त
कोकणात भात शेती हे एकमेव असलेले पीक अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे आलेल्या पावसात जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोकणातील शेतकऱ्याला मदत करा असे आवाहन भास्कर जाधव यांनी पत्राद्वारे सरकारला केलं आहे. कितीही बिकट परिस्थिती आली तरी कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही. मात्र, या वेळेची परिस्थिती लक्षात घेऊन कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे.
पत्रात नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसानं कोकणातील शेतकऱ्यांचे एकमेव पिक असलेल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना जशी सरकारने मदत केली तशीच मदत कोकणातील शेतकऱ्यांना देखील करावी असी मागणी भऊास्कर जाधव यांनी केली आहे. पावसामुळं काढणीला आलेले भाताचे पिक आडवे पडले आहे. त्यांना कोंब फुटले आहे. पिकात पाणी साचल्यामुळं पिकं सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं सरकारनं तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात केली आहे.
कोकणतील शेतकरी कितीही संकट आले, नुकसान झाले तरी आत्महत्या करत नाही
भात पिक हे कोकणातील प्रमुख पिक आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या पिकावर चालतो. पण सध्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. हातातोंडाशी आलेले पिक डोळ्यादेखत वाया गेले आहे. कोकणतील शेतकरी कितीही संकट आले, नुकसान झाले, अन्याय झाला किंवा कर्जबाजारी झाला तरी आत्महत्या करत नाही. त्यामुळं सरकार कोकणातील शेतकऱ्यांकडे कायमच दुर्लक्ष करत आल्याचे भास्कर जाधव यांनी पत्रात म्हटलं आहे. यावेळची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळं सरकारनं मदत करावी अशी मागणी भास्कर जाधव ायंनी केली आहे.
















