एक्स्प्लोर
बेळगावात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला, कर्नाटक सरकारविरोधात राज्यभर निदर्शनं
बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले आहे. कर्नाटक सरकार विरोधात राज्यभर आंदोलनं करण्यात आली. दरम्यान, यानंतर आठ दिवसात पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई : बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. यावेळी शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
मणगुत्ती गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
दरम्याम ज्या गावात पुतळा हटवला त्या मणगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी ,पंच मंडळी यांची बैठक सुरु आहे. 5 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. गावातील एका गटाचा त्याला विरोध होता. ग्राम पंचायतींने परवानगी दिली होती. पण पुतळा हटविण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. गावातील महिला,तरुण संख्येने गावातील चौकात जमले आहेत. यासंदर्भात पोलीस बैठक घेत आहेत. पुतळा त्वरित बसवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पुतळा बसवेपर्यंत मागे हटणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. आठ दिवसात एकमेकांच्या सहमतीने आठ दिवसात तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मणगुत्ती गावातील वातावरण आणखी तणावाचे बनण्याची शक्यता आहे. कारण बाहेरील गावातून आंदोलक गावात येण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोल्हापुरातील शिवसैनिकांचे आंदोलन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन केले. कर्नाटक सरकारची तिरडी करून दहन केलं. महाराष्ट्रात भाजपचे शिवरायांबद्दल बेगडी प्रेम असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
नागपुरात आंदोलन
बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या प्रकरणात नागपुरात शिवसैनिकांनी आंदोलन केले. महाल परिसरातील गांधी गेट जवळील महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शिर्डी, यवतमाळमध्ये शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारचा निषेध
शिर्डीत शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन यावेळी करण्यात आलं. पुतळ्यास बांगड्यांचा हार घालत पुतळ्याचं दहन केलं. तसंच यवतमाळच्या वणीमध्ये पुतळा हटविल्या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा वणी येथे शिवसैनिकांनी जाळला.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी आंदोलन केले.
जालन्यात शिवसैनिकांचा संताप
बेळगाव जिल्ह्यातील येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून शिवप्रेमीमध्ये संताप व्यक्त होताना दिसत आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी पुतळा सन्मानाने पुन्हा त्या जागी बसवावा अशी मागणी केलीय.
तर पुतळा हटवण्यावरून शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्यांना इशारा दिलाय. पुतळा हटविण्याचे खरे धनी भाजपचे लोक असून भाजपच्या वरिष्ठांनी आपले वर्तन आणि वागणं बदलावं अन्यथा लोकं कायदा हातात घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत,त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असेही ते म्हणालेत.
धुळे, हिंगोली, वाशिममध्येही आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे धुळ्यात शिवसेनेच्या वतीनं जोडे मारून दहन करण्यात आलं. धुळे महानगर पालिकेच्या जुन्या इमारती समोर शिवसेनेनं हे आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.तर हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर व शिवसैनिकांनी हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाशिम शिवसेनेच्या वतीने कर्नाटक भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा खरा चेहरा या निमित्ताने उघडा झाला असून रातोरात महाराजांचा पुतळा हटवला गेल्याबद्दल भाजप सरकारने मौन का धारण केले? असा सवाल शिवसैनिकांनी केला आहे.
पुतळा हटवणे निंदनीय - विनायक मेटे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणे निंदनीय आहे. कर्नाटकमध्ये सरकार कोणाचंही असो, सत्ताधारी कुठल्याही पक्षाच असू दे, त्याचा महाराष्ट्राबद्दल सीमा भागाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल त्यांची चांगली भावना नाही. अनेक वेळा अपमान करायचही धाडस केलं आहे.राज्यात कुठलेही सरकार असो त्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. जर तिकडे कुठेही अन्य ठिकाणी महान व्यक्तींचा अपमान केला तर या ठिकाणच्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो, असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
उल्हासनगरात शिवसेना येदियुरप्पांविरोधात आक्रमक
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक झालीय. उल्हासनगरात आज शिवसेनेनं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या प्रतिमेला जोडे मारत निदर्शनं केली. उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात देखील शिवसैनिकांनी येडीयुरप्पा यांच्या प्रतिमेला जोडे मारले. भाजप सरकार आणि नेते हे "मूह में राम, बगल मे छुरी" असं राजकारण करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. याआधीही अभ्यासक्रमातून शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास वगळण्यात आला होता. कर्नाटक सरकारच्या या मराठी द्वेषाचा शिवसेनेनं निषेध केला. दरम्यान या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
नाशिक
राजकारण
बीड
Advertisement